राज्यात आजपासून दहावीची परीक्षा 

राज्यात आजपासून दहावीची परीक्षा 

पुणे - करिअरचा "टर्निंग पॉइंट' ठरणारी दहावीची लेखी परीक्षा राज्यभरात मंगळवारपासून सुरू होत असून, या वर्षी 17 लाख 66 हजार 98 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत 2.33 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची या वर्षीपासून स्वतंत्र नोंद ठेवण्यात येणार आहे. त्यातील परीक्षेला सातत्याने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांवर "वॉच' ठेवला जाणार असून, त्याद्वारे पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील,'' असे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील नऊ लाख 89 हजार 908 विद्यार्थी आणि सात लाख 76 हजार 190 विद्यार्थिनी ही परीक्षा देणार आहेत. एकूण 21 हजार 686 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात 16 लाख 52 हजार 270 नियमित आणि 64 हजार 412 पुनर्परीक्षार्थी आहेत. या परीक्षेसाठी राज्यात चार हजार 728 परीक्षा केंद्रे आहेत. 

विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने बहुतांश विषयांच्या परीक्षेदरम्यान खंड ठेवला आहे, तर इंग्रजी (तृतीय भाषा), गणित, सामान्य गणित या विषयांकरिता बहुसंची प्रश्‍नपत्रिका असेल. 

विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिकेचे वाचन आणि आकलन होण्यासाठी परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्‍नपत्रिका देण्यात येईल. परीक्षेसाठी अनिवार्य विषय गटात द्वितीय भाषा, समाजशास्त्र विषयास पर्याय म्हणून राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत एकूण दहा विषयांचा समावेश करण्यात आला आहे. मार्च 2017 मध्ये नियमित आणि पुनर्परीक्षार्थी यांसह सर्व विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय/तृतीय आणि संयुक्त भाषा विषयांसाठी कृतीप्रतिकेवर आधारित प्रश्‍नपत्रिका असणार आहेत, असे म्हमाणे यांनी सांगितले. 

गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न 
परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळामार्फत प्रत्येक जिल्ह्यासाठी सात याप्रमाणे संपूर्ण राज्यात 250 भरारी पथके नेमली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन केल्या आहेत. विशेष महिला भरारी पथकांसह काही विभागीय मंडळात विशेष मराठी पथके असतील. राज्य मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकारी परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देतील. परीक्षा केंद्राच्या परिसराचे व्हिडिओ चित्रीकरणदेखील होणार आहे. 

अपंग विद्यार्थ्यांसाठी सुविधा 
अपंग गटाच्या विविध संवर्गातून सात हजार 414 विद्यार्थी परीक्षा देत असून, या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीचे परीक्षा केंद्र, वेळेची सवलत, मागणीनुसार लेखनिक, विषय योजना अशा सवलती देण्यात येत आहेत. दृष्टिहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सीने बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना सवलती दिल्या असून त्यासाठी संबंधित विभागीय मंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक आहे. अपंग प्रवर्गातील फक्त स्वमग्न विद्यार्थ्यांनाच कॅलक्‍युलेटर वापरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. 

परीक्षार्थींचे संख्या 
तपशील ः मार्च 2016 ः मार्च 2017 ः संख्येत झालेली वाढ (टक्केवारीत) 
एकूण परीक्षार्थी ः 17,27,496 ः 17,66,098 ः 2.33 
विद्यार्थी संख्या ः 9,55,186 ः 9,89,908 ः 3.64 
विद्यार्थिनी संख्या ः 7,72,310 ः 7,76,190 ः 0.50 

दहावीच्या परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात यावी, अशा सूचना सर्वांना दिल्या आहेत. यातील सातत्याने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांवर "वॉच' ठेवला जाईल, अशा विद्यार्थ्यांचा संबंध परीक्षेदरम्यान होणाऱ्या "पेपरफुटी' प्रकरणाशी आहे का, हे तपासले जाईल. त्याद्वारे "पेपरफुटी'चे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील. 
- गंगाधर म्हमाणे, राज्य मंडळाचे अध्यक्ष 

समुपदेशकांची नियुक्ती 
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक विभागीय मंडळात प्रत्येकी एक याप्रमाणे जिल्हानिहाय समुपदेशक नेमले आहेत. राज्य मंडळ स्तरातून राज्यात दहा समुपदेशक नेमण्यात आले आहेत. 

हेल्पलाइन 
विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाने सुरू केलेल्या हेल्पलाइनचे क्रमांक पुढीलप्रमाणे 
020-25705271 आणि 020-25705272 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com