दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी  सोमवारपासून ऑनलाइन नोंदणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

दहावी आणि बारावी परीक्षेस बहिःस्थ पद्धतीने (17 नंबर फॉर्म भरून) बसणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी सोमवार (ता. 29) पासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना 24 ऑगस्टपर्यंत ही नोंदणी करता येईल.

पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेस बहिःस्थ पद्धतीने (17 नंबर फॉर्म भरून) बसणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी सोमवार (ता. 29) पासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना 24 ऑगस्टपर्यंत ही नोंदणी करता येईल. मात्र, ऑफलाइन अर्ज स्वीकारणार नाहीत. 

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र विद्यार्थ्यांनी जवळ ठेवावे. तसेच, कागदपत्रांचे स्कॅनिंग करून वा स्पष्ट फोटो काढून ते अपलोड करायचे आहेत. अर्जात विद्यार्थ्याचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी नोंदविणे बंधनकारक आहे.

अर्ज भरून झाल्यावर त्याची प्रत विद्यार्थ्याला अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाणार आहे. विद्यार्थ्याने या अर्जाची प्रिंट, शुल्क पावती आणि हमीपत्र यांसह दोन प्रती काढून घ्याव्यात. अर्ज तसेच विहित शुल्क आणि मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळेत वा कनिष्ठ महाविद्यालयात निश्‍चित केलेल्या मुदतीत जमा करायची आहेत. शुल्क हे संपर्क केंद्रामध्ये रोखीने जमा करायचे आहे. त्याची पावती शाळेच्या सही, शिक्‍क्‍यासह स्वत:जवळ ठेवायची आहे. 

विद्यार्थ्याने केलेल्या ऑनलाइन नोंदणीनुसार त्याच्या पत्त्यानुसार आणि त्याने निवडलेल्या माध्यमनिहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल. त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड त्याने करायची आहे. या केंद्राने प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्प, श्रेणी विषयांबाबत कामकाज आणि अनुषंगिक मूल्यमापन करायचे आहे. बारावीच्या परीक्षेसाठी या संपर्क केंद्राद्वारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा घेतल्या जातील. 

दिव्यांग विद्यार्थ्यांना बहिःस्थ पद्धतीने परीक्षेला बसायचे असेल, तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या वा प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करायची आहे. सर्व विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन देणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे. 

तपशील मुदत 
- ऑनलाइन नावनोंदणी करणे 29 जुलै ते 24 ऑगस्ट 
- मूळ अर्ज, शुल्क जमा करणे 30 जुलै ते 26 ऑगस्ट 
- दहावीसाठी शुल्क : 1000 रुपये (नोंदणी, प्रक्रिया शुल्क) 
- बारावीसाठी शुल्क : 600 रुपये (नोंदणी, प्रक्रिया शुल्क) 
- संकेतस्थळ (दहावीसाठी) : http://form17.mh-ssc.ac.in 
- संकेतस्थळ (बारावीसाठी) : http://form17.mh-hsc.ac.in 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SSC-HSC online exam