दहावीच्या गुणपत्रिका वाटपात गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

पुणे - दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्सुकता होती ती गुणपत्रिका प्रत्यक्ष हातात घेऊन पाहण्याची. अनेक विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्याही आणि त्या हातात घेऊन विद्यार्थ्यांनी जल्लोषही केला; परंतु वर्गातील काहींच्या हातात गुणपत्रिका पडल्याच नाहीत, म्हणून अनेकांचे चेहरे हिरमुसले. दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाच्या सावळ्या गोंधळामुळे शुक्रवारी गुणपत्रिका न मिळाल्याने अनेक विद्यार्थी नाराज झाले.

दहावीचा निकाल लागल्यानंतर शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना शाळांमार्फत गुणपत्रिका देण्यात आल्या. त्याची पूर्वतयारी म्हणून शाळांनी विभागीय मंडळाने नेमून दिलेल्या वितरण केंद्रावर सकाळी अकरा वाजता जाऊन गुणपत्रिका घेण्यासाठी गर्दी केली होती.

त्याचवेळी काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी दहावीच्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कमी गुणपत्रिका मिळाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याबद्दल त्यांनी संबंधित वितरकांना विचारले. मात्र, तुम्ही विभागीय मंडळात विचारा, असे उत्तर देत वितरकांनी हात वर केले.

पुणे जिल्ह्यातील जवळपास 16 शाळांनी गुणपत्रिका मिळाल्या नसल्याची तक्रार केल्याचे पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी सांगितले. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना खराब गुणपत्रिका मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या तुलनेत कमी गुणपत्रिका गेल्या आहेत. शाळांनी संबंधित वितरकांकडून खात्री करून गुणपत्रिका शाळेत नेणे अपेक्षित होते. तसेच काही गुणपत्रिका या शाळेच्या-त्या शाळेला गेल्या असतील; परंतु विद्यार्थ्यांच्या भावनेचा विचार करता संबंधित गुणपत्रिका एक-दोन दिवसांत दिल्या जातील.''
- बी. के. दहिफळे, सचिव, पुणे विभागीय शिक्षण मंडळ

शाळेतील विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाची उत्सुकता होती; परंतु शाळेतील पाच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपत्रिका न मिळाल्याने ते नाराज झाले. गुणपत्रिका न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत गुणपत्रिका मिळतील, असे विभागीय मंडळाने कळविले आहे.
- संतोष भंडारी, मुख्याध्यापक, भारतीय जैन संघटना विद्यालय, वाघोली

Web Title: ssc marksheet distribution confussion