Pune : परिस्थितीमुळे शिक्षण अपूर्ण! मेस चालवून थाटला संसार; वयाच्या 53व्या वर्षी मॅट्रिक पास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC Result

Pune : परिस्थितीमुळे शिक्षण अपूर्ण! मेस चालवून थाटला संसार; वयाच्या 53व्या वर्षी मॅट्रिक पास

पुणे : मनात जिद्द आणि एखादी गोष्ट शेवटपर्यंत नेण्याची महत्त्वकांक्षा असेल तर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात, याचीच प्रचिती पुण्यातील वर्षा बक्षी या महिलेच्या रूपाने आली आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी वर्षा यांनी दहावीची परीक्षा देण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं असून ५० टक्के गुणांसह पासही झाल्या आहेत.

वर्षा या सध्या पुण्यातील गोखलेनगर भागात मेस चालवतात. लहानपणापासून त्यांना शिक्षणाची आवड होती पण कुटुबांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही. कुटुंबात मोठ्या असल्यामुळे लहान भावाची जबाबदारीही त्यांच्यावर होती. लहानपणी त्यांनी शनिपार चौकात कॅलेंडर विकणे, वडापाव, भजी विकणे, निराच्या दुकानावर काम करणे अशी हाताला मिळतील ती कामे केली. शाळेत असताना त्या हुशार होत्या पण त्यांना फक्त सातवीपर्यंतच शिक्षण घेता आलं.

Result

Result

लग्न झाल्यानंतरही त्यांच्या वाट्याला संघर्षच आला होता. पहाटे पाच वाजता उठायचं, घरातल्या झोपलेल्या कुणालाच त्रास होणार नाही याची काळजी घेत स्वयंपाक करत सात वाजायच्या आत डबा आणि नाष्टा तयार करायचा त्यानंतर देवपूजा, सकाळी येणाऱ्या जाणाऱ्यांना चहा, परत संध्याकाळी २० ते २२ डबे देण्याची गडबड. असा त्यांचा नित्यनेम होता.

आयुष्यात एवढा संघर्ष असूनही त्यांची शिक्षणाची इच्छा कमी झाली नाही. त्या हार मानणाऱ्यातील नव्हत्या. मग काय... अखेर ठरलं! शनिपार येथील रमाबाई रानडे प्रौढ शिक्षण सेवा सदनमध्ये त्यांनी उर्वरित शिक्षण पुन्हा सुरू केलं. मेसमुळे अभ्यासाला वेळ मिळत नव्हता. पण त्या रात्री सगळं काम आवरल्यावर १ ते २ वाजता अभ्यास करायच्या. आठवी, नववी पास झाल्यानंतर यावर्षी त्यांनी दहावीची परिक्षा दिली अन् तब्बल ५० टक्के गुणांसहित पासही झाल्या.

निकालानंतर सर्वांनी त्यांचं कौतुक केलं. यानंतर पुढे नवीन काहीतरी करण्याची त्यांची इच्छा आहे.त्यांना एक मुलगा असून सून आणि मुलगा दोघेही फोटोग्राफर आहेत. निवृत्त होण्याच्या वयातील त्यांच्या या जिद्दीला आणि जोशाला सलाम. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सकाळकडून खूप खूप शुभेच्छा.

मी लहान असताना आई धुणभांडी करायची, वडील मद्यपान करायचे, मला शाळेत जायला ड्रेससुद्धा नव्हता, १५-१५ दिवस वडील दवाखान्यात दाखल असायचे. भाऊ लहान असल्यामुळे मला त्याची काळजी घ्यावी लागायची. मी कामाला नाही गेले तर पैसे येत नसायचे म्हणून मला शाळा सोडून काम करावं लागायचं. माझी शिक्षणाची इच्छा अपूर्ण होती पण माझ्या सुनेने आणि मुलाने मला पाठिंबा दिला म्हणून मी शिकले. शाळेनेही खूप चांगला पाठिंबा दिला. मी आज मेसमधून पैसे कमावते पण एवढं कष्ट करून मी दहावी पास झाले ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पुढे अजून खूप शिकण्याची इच्छा आहे.

- वर्षा बक्षी (दहावी पास झालेल्या ५३ वर्षाच्या महिला)

सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्या कामाची गडबड सुरू असते. त्या रात्री कधी झोपतात तेही माहीती नाही पण सर्वांच्या आधी उठून डब्यांची तयारी करतात. आम्हाला संभाळता संभाळता त्यांनी त्यांचं स्वप्न आज पूर्ण केलं. त्यांच्या या जोशाला आणि जिद्दीला आम्ही सलाम करतो.

- श्रुती बक्षी (वर्षा यांच्या सून)