दहावीच्या विद्यार्थ्यांना बसणार सुखद धक्का? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

पुणे - दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या हातात पडणार आहेत. त्यामुळे दरवर्षी पाठ्यपुस्तके मिळण्यास होणाऱ्या विलंबाच्या पार्श्‍वभूमीवर "बालभारती'कडून पुस्तके वेळेत देण्याचा सुखद धक्का विद्यार्थी-पालकांना मिळणार आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेची तयारी एप्रिलपासूनच करता येणार आहे. 

पुणे - दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या हातात पडणार आहेत. त्यामुळे दरवर्षी पाठ्यपुस्तके मिळण्यास होणाऱ्या विलंबाच्या पार्श्‍वभूमीवर "बालभारती'कडून पुस्तके वेळेत देण्याचा सुखद धक्का विद्यार्थी-पालकांना मिळणार आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेची तयारी एप्रिलपासूनच करता येणार आहे. 

काही शाळांचे दहावीचे नव्या वर्षाचे वर्ग या महिन्याच्या पहिल्या तर काही शाळांचे वर्ग दुसऱ्या आठवड्यात सुरू होत आहेत. मात्र, पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध झालेली नाहीत. पाठ्यपुस्तके वेळेत उपलब्ध करून देण्यात येतील, असे "बालभारती'च्या वतीने दरवर्षी सांगण्यात येते, मात्र ही पुस्तके वेळेत उपलब्ध होत नाहीत. नववीची वार्षिक परीक्षा संपताच विद्यार्थ्यांचा दहावीचा अभ्यास सुरू होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकही बाजारात पुस्तके येण्याची वाट पाहत असतात. 

यावर्षी दहावीसह पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रम बदला आहे. ज्ञानरचनावाद या रचनेनुसार अध्यापन सुलभ व्हावे, अशा दृष्टीने नव्या अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. यापूर्वीचा अभ्यासक्रम घोकंपट्टी, पाठांतरावर भर असणारा होता. आता कृतिशील आणि उपाययोजना यावर आधारित अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आता दहावीसह आठवीच्या विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाचा धडा वाचल्यानंतर; "तुम्हाला काय संदेश मिळाला', "तुमचे मत सांगा', "...याचे महत्त्व तुमच्या शब्दांत मांडा', "तुम्ही केलेली निरीक्षणे नोंदवा', अशा स्वरूपाचे प्रश्‍न धड्याखाली विचारल्याचे दिसणार आहे. इयत्ता आठवी आणि पहिलीची बदललेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकेही टप्प्याटप्याने बाजारात येतील, असे सांगण्यात आले आहे. 

""दहावीच्या पाठ्यपुस्तकाचे वितरण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. दहावीच्या सर्व माध्यमांची सर्व पाठ्यपुस्तके "बालभारती'च्या राज्यातील दहा डेपोमध्ये येत्या मंगळवार (ता.3)पासून वितरकांसाठी उपलब्ध होतील. वितरकांमार्फत पाठ्यपुस्तकांची खरेदी झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत ही पुस्तके बाजारपेठेत येतील.'', 
- सुनील मगर, संचालक, बालभारती 

Web Title: ssc student books timings from Bal Bharti pune