भोरमध्ये एसटी अपघातात नऊ गंभीर जखमी

विजय जाधव
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

भाटघर धरणाजवळील नीरा-देवघर प्रकल्पाच्या कार्यालयाशेजारी भोर आगाराची एसटी बस खड्ड्यात घसरून झालेल्या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडला.

भोर, ता. 1 : भाटघर धरणाजवळील नीरा-देवघर प्रकल्पाच्या कार्यालयाशेजारी सांगवी हिमा गावच्या हद्दीत राज्य परिवहन महामंडळाच्या भोर आगाराची बस खड्ड्यात घसरून झालेल्या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडला.

सुमन खोपडे (भोलावडे), मुक्ताबाई भिलारे (वरोडी), नवनाथ काटकर (भोर), मारुती बागल (नाझरे), चंद्रकांत चंदनशीव (किवत) आणि मारुती झुनगारे (सांगवीभिडे) या जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, भोर पोलिसांनी चालक शिवाजी बळी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

भोर आगारातील चालक शिवाजी बळी व वाहक मीनाक्षी भस्मे हे सकाळी 10 वाजता एसटी घेऊन स्वारगेटला निघाले होते. एसटीत सुमारे 25-30 प्रवासी होते. भाटघर धरणाजवळ नीरा-देवघर कार्यालयाच्या उतारावर समोरून गाडी आल्याने चालकाचा ताबा सुटला आणि एसटी डाव्या बाजूच्या गटाराच्या खड्ड्यात उलटली. आवाज ऐकल्यावर नीरा-देवघर प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी धावत गेले. शिवाजी डेंगळे, नामदेव पवार, पांडुरंग शिंदे, राजू आवळे, दत्तात्रेय कोरके, राहुल गिलबिले, भैरवनाथ काटे, चेतन पालवे, प्रशांत चऱ्हाटे, संतोष कांबळे या कर्मचाऱ्यांनी एसटीच्या पुढील व मागील काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरवात केली. एसटीतील युवक-युवती एसटीच्या खिडक्‍यांमधून बाहेर आले. एसटीच्या मागे असलेले मुख्याध्यापक प्रदीप वीर यांनीही त्यांनी सहकार्य केले. घटनेची माहिती मिळताच भोरमधील सह्याद्री रेस्क्‍यू फोर्सचे कार्यकर्ते, पोलिस, एसटीचे अधिकारी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना भोरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काही प्रवाशांनी घरी फोन करून कुटुंबातील व्यक्तींना बोलावून घेऊन खासगी दवाखान्यात जाणे पसंत केले. सह्याद्री फोर्सचे सचिन देशमुख, प्रमोद रवळेकर, अक्षय दामगुडे व संजय खरमरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. आगारप्रमुख स्वाती आवळे यांनीही घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Bus Accident Near Bhor