या एसटी आगारात नाही कर्मचारी, नाही बस...

STagar
STagar

मंचर (पुणे) : राज्य परिवहन महामंडळाने अडीच वर्षांपूर्वी तांबडेमळा (ता. आंबेगाव) आगाराचे काम पूर्ण केले आहे, त्यासाठी तीन कोटी 50 लाख रुपये खर्च केले; पण आवश्‍यक असलेली यंत्रसामग्री, नवीन एसटी गाड्या उपलब्ध होत नाहीत. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नेमणुकांबाबत निर्णय झालेला नाही, त्यामुळे आगार वापराविना पडून आहे.

राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीकडून व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी हे आगार लवकर सुरू करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. राज्यात जवळपास प्रत्येक तालुक्‍यासाठी स्वतंत्र आगाराची व्यवस्था आहे. पण आंबेगाव तालुक्‍यासाठी आगारच नव्हते. राजगुरुनगर व नारायणगाव या दोन आगारांमार्फत आंबेगाव तालुक्‍यातील 143 गावांसाठी एसटी गाड्यांचा पुरवठा केला जात आहे.

राज्य परिवहन महामंडळाने मंचरला आगार करण्याचा निर्णय घेतला; पण पुरेशा प्रमाणात व तांत्रिकदृष्ट्या योग्य जागा मिळत नव्हती. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत मंचरच्या दक्षिणेला अडीच किलोमीटर अंतरावर तांबडेमळा ग्रामपंचायतीने पाच एकर जागा उपलब्ध करून दिली. वळसे पाटील यांनी लोकशाही आघाडी सरकारच्या काळात पाठपुरावा केल्यानंतर आगाराला मान्यता व निधी मिळाला. भाजप- शिवसेना युती सरकारच्या काळात आगाराचे काम सुरू झाले. जुलै 2017 मध्ये इमारतीचे बांधकाम व 25 लाख रुपये खर्च करून विजेची कामेही झाली आहेत; पण उद्‌घाटन झालेच नाही.

हे काम मुंबई कार्यालयाचे
बांधकाम पूर्ण झाले आहे. यंत्रसामग्री, नवीन एसटी गाड्या, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नेमणुका हे काम राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाचे आहे. पुणे विभाग नियंत्रक कार्यालयाच्या कक्षेत ही बाब येत नसल्याचे पुणे विभाग नियंत्रक कार्यालयातील बांधकाम विभागातून सांगण्यात आले.

मंचरला प्रवाशांचे हाल
सध्या मंचर बस स्थानकावरून तालुक्‍यात, तसेच पुणे व मुंबईला जाण्यासाठी एसटी गाड्यांची संख्या फारच कमी आहे. दीड हजार पासधारक विद्यार्थी आहेत; पण त्यांच्या सोयीनुसार एसटी गाड्या उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचा दररोज दोन ते तीन तास वेळ बसस्थानकावर वाया जात आहे. शिवशाही बससह लांब पल्ल्याच्या अनेक एसटी गाड्या मंचरला थांबत नाहीत. लग्नसराई यात्रांचा हंगाम सुरू आहे. मंचर बस स्थानकावर नेहमीच गर्दी असते. दर आठवड्याला मंचर बसस्थानकातून अनेक मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्या जातात. प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.


राज्य परिवहन महामंडळाला आगारासाठी मंचर परिसरात जागा मिळत नव्हती. तांबडेमळा ग्रामपंचायतीने ताबडतोब ग्रामसभेचा ठराव घेऊन पाच एकर जागा आगारासाठी उपलब्ध करून दिली आहे; पण वापराविना आगारात इमारत उभी आहे. आगार लवकर सुरू व्हावे म्हणून ग्रामस्थांचे शिष्टमंडळ दिलीप वळसे पाटील यांना लवकरच भेटणार आहे. आगार सुरू झाल्यानंतर प्रवाशांची सोय होणार आहे.
- ज्ञानेश्वर भोर, सरपंच, तांबडेमळा, ता. आंबेगाव

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com