एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल

एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल

पुणे - एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी संपाचे हत्यार उपसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. जिल्ह्यातील बहुतांश स्थानकांमध्ये शुकशुकाट होता. संपात शिवसेनाप्रणीत कामगार सेनेचे कर्मचारी मात्र सहभागी झाले नव्हते, त्यामुळे भोर आणि नारायणगाव आगारांतून एसटी बसच्या काही फेऱ्या सुरू होत्या. खासगी प्रवासी वाहतूकदारांनी मात्र संपाचा फायदा उठवत अव्वाच्या सव्वा भाडे आकारत प्रवाशांची लूट केली.

मंचरला शुकशुकाट
मंचर : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता. ८) संप पुकारल्याने आंबेगाव तालुक्‍यात मंचर व घोडेगाव येथील बस स्थानकांवर शुकशुकाट होता. राजगुरुनगर व नारायणगाव आगाराचा तेरा लाख रुपये महसूल बुडाल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. एसटी संपाचा फटका प्रवासी व इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना बसला. प्रवाशांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागला. अनेक प्रवाशांनी पुणे, मुंबई भागातील दौरे रद्द केले. तर या पूर्वी मुंबईला सुटीनिमित्त गेलेल्या अनेक प्रवाशांनी मुंबईतच थांबणे पसंत केले. भीमाशंकर येथे मुक्कामी थांबलेल्या भाविकांची गैरसोय झाली.  

बारामतीत प्रवासी रडकुंडीला
बारामती/सांगवी - एसटी कामगारांनी रात्री अचानक  पुकारलेल्या अघोषित संपामुळे आज बारामती बस स्थानकात  प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. संपाची माहिती नसल्याने  तातडीच्या कामासाठी निघालेले प्रवासी तर रडकुंडीला आले होते. दरम्यान, शिवसेनाप्रणीत संघटना वगळता इतर संघटनांनी संपात सहभाग घेतल्याने आज दिवसभरात एसटीने उत्पन्नातले १६ लाख गमावले.

एसटी संघटनेने आज पहाटेपासूनच संप पुकारल्याने बारामतीतून बोटावर मोजण्याएवढ्या बस वगळता इतर सर्व बससेवा ठप्प राहिली. दीर्घ पल्ल्याच्या बससेवेवर पूर्णत- परिणाम झाला. आज सकाळपासून आलेले प्रवासी येथे अडकून पडले. 

अनेकांना खासगी वाहनेही मिळाली नाहीत. बस स्थानकाचे आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी या संपाबाबत थेट कानावर हात ठेवले. आमच्याकडे कोणत्याही संघटनेने कोणतेही पत्र दिलेले नसल्याने मला यातील काहीच माहिती नाही, वाटल्यास तुम्ही कर्मचारी संघटनेच्या नेत्यांकडूनच माहिती घ्या, असे त्यांनी स्पष्ट केले.  

नारायणगावात ३८६ फेऱ्या रद्द
नारायणगाव  : राज्य एसटी कामगार संघटना व इंटक संघटनेतर्फे पुकारलेल्या बंदमुळे प्रवासी, शालेय विद्यार्थांची गैरसोय झाली. संपामुळे नारायणगाव आगारातील शंभर बसच्या नियोजित ३८६ फेऱ्या रद्द झाल्याने राज्य परिवहन मंडळाचे सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. प्रवाशांची अडचण विचारात घेऊन संपात सहभागी न होता बस घेऊन निघालेल्या चालकाला महिला वाहकांनी बांगड्या घालून पावडर लावल्याने आगारात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

संपात नारायणगाव आगारातील नव्वद टक्के कर्मचारी सहभागी झाले होते. शिवसेना कामगार संघटनेचे काही चालक व वाहक संपात सहभागी झाले नव्हते. संपामुळे नारायणगाव आगारातील शंभर बस येथील आवारात लावण्यात आल्या होत्या. दिवसभरात नारायणगाव आगारातून चारशे फेऱ्या होतात. आज दुपारपर्यंत केवळ चौदा फेऱ्या झाल्या. 

संपात सहभागी न होता मंचर येथे बस घेऊन निघालेल्या संतोष भोर या चालकाला काही महिला वाहकांनी बांगड्या घालून पावडर लावली. वाहक अविनाश कोठावदे याला काही कर्मचाऱ्यांनी दम भरला. त्यानंतर दहशतीमुळे बस घेऊन जाण्यास चालक व वाहकांनी नकार दिला, असे आगार प्रमुख आर. डी. मगर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com