भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांना आर्थिक भुर्दंड

डी. के. वळसे पाटील
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे एसटीतून दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची राज्य परिवहन महामंडळाकडून लूट केली जात आहे. मंचर ते भीमाशंकर एसटीचे भाडे 85 रुपये आहे; पण प्रवाशांना म्हतारबाचीवाडी येथे सोडले जाते. तेथून पुन्हा भीमाशंकरपर्यंत जाण्यासाठी मिनी एसटी बसमध्ये बसल्यानंतर दहा रुपये तिकिटाचा भुर्दंड सोसावा लागतो.

मंचर (पुणे) : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे एसटीतून दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची राज्य परिवहन महामंडळाकडून लूट केली जात आहे. मंचर ते भीमाशंकर एसटीचे भाडे 85 रुपये आहे; पण प्रवाशांना म्हतारबाचीवाडी येथे सोडले जाते. तेथून पुन्हा भीमाशंकरपर्यंत जाण्यासाठी मिनी एसटी बसमध्ये बसल्यानंतर दहा रुपये तिकिटाचा भुर्दंड सोसावा लागतो.

दररोज पुणे व मंचरहून 15 एसटी गाड्या भीमाशंकरकडे जातात. प्रत्येक एसटी गाडीत सरासरी 60 ते 70 प्रवासी असतात. श्रावणी सोमवारी व शनिवारी भीमाशंकर परिसर रस्त्यावर वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून भीमाशंकरच्या पूर्वेला सात किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हतारबाचीवाडी येथे पोलिस खात्याने वाहनतळ तयार केले आहे. या वाहनतळावर एसटी गाड्या व इतर खासगी वाहने थांबून प्रवाशांना उतरविले जाते. म्हतारबाचीवाडीच्या पुढे फक्त एसटीच्या मिनी बस सोडल्या जातात. येथे पुन्हा प्रवाशांना दहा रुपये भाडे घेतले जाते.

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त डिंभे फाटा येथून भीमाशंकरला जाण्यासाठी 70 रुपये तिकीट फाडले; पण एसटी गाडी भीमाशंकरला गेली नाही. म्हतारबाचीवाडीच्या येथे सर्व प्रवाशांना उतरविले. मिनीबसमध्ये बसल्यानंतर दहा रुपयांचे तिकीट पुन्हा घ्यावे लागले. या वेळी वाहकाबरोबर प्रवाशांचा वादही झाला.
ज्ञानेश्वर महादू राऊत, प्रवासी, कळंब, ता. आंबेगाव

भीमाशंकरपर्यंत एसटीचे तिकीट काढलेल्या प्रवाशांकडून म्हतारबाचीवाडी ते भीमाशंकर या मार्गासाठी मिनीबसमध्ये पुन्हा तिकीट घेऊ नये, अशा सूचना वाहकांना दिल्या आहेत. याबाबत अंलबजावणी होत नसेल, तर अधिकारीवर्गाकडून पाहणी करून प्रवाशांना न्याय दिला जाईल.
आर. जी. हांडे, आगारप्रमुख, राजगुरुनगर, ता. खेड

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Bus Fair To Bhimashankar