माणुसकी आटत चालली आहे का?... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

पारगाव - दुचाकीला अनोळखी एसटीने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुणांच्या शरीरावरून एसटीचे चाके जाऊन गंभीर जखमी झालेले दोन तरुण रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असतानाही धडक देणारे वाहनचालक जागेवर न थांबता वाहन सुसाट वेगाने घेऊन जातो, त्या एसटीतील प्रवाशांपैकी एकाला का वाटले नाही, की चालकाला एसटी थांबवून जखमींना दवाखान्यात न्यावे किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात फोन करावा. परंतु, असे काहीच घडले नाही. त्या दोन्ही तरुणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेवरून समाजातील माणुसकी आटत चालली आहे का? असा प्रश्‍न पडतो. 

पुणे-नाशिक महामार्गावर कळंब (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत शुक्रवारी (ता. 27) भर दुपारी अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील वैभव वासुदेव रामकर (रा. कळंब) व आकाश अशोक जाधव (रा. गेवराई, जि. बीड) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. वाहन हे हिरकणी एसटी असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते. त्या एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी कोणीही एसटी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. चालकही बेजाबदारपणे एसटी न थांबवता तशीच पुढे घेऊन आला. 

मंचर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के यांनी प्रत्यक्षदर्शी व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज या आधारे अपघात घडला त्या वेळी या रस्त्याने नारायणगावच्या बाजूने काही अंतराने तीन हिरकणी एसटी पुण्याच्या दिशेने गेल्या होत्या. त्यापैकी एक एसटी मंचर व राजगुरुनगर बसस्थानकात आतमध्ये न जाता प्रवाशांना रस्त्यावरच उतरून पुढे गेली. त्यामुळे त्या एसटीवर संशय बळावला व तपासाला नक्की दिशा मिळाल्याने शनिवारी (ता.28) अपघात ज्या वेळी घडला त्याच वेळी नारायणगावच्या बाजूने एक हिरकणी एसटी आली. सकाळपासूनच लक्ष ठेवून असलेले कळंब ग्रामस्थांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला, पण ती न थांबल्याने त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक म्हस्के यांना कळविले. त्यांनी व ग्रामस्थांनी पाठलाग करून तिला मंचर ते अवसरी फाटादरम्यान अडविले व त्या एसटीची पाहणी केली असता, एसटीचा अपघाताने पत्रा चेपलेला आहे. एसटीला रक्त चिकटलेले आढळले. अपघात केलेले वाहन हेच असल्याचे तपासात सिद्ध झाले. परंतु, अपघात केलेला चालक दुसरा होता, तो सुट्टीवर गेला होता. त्याने अपघाताची कबुलीही दिल्याचे म्हस्के यांनी सांगितले. 

Web Title: ST bus hit bike