Coronavirus : आता 'लालपरी'वर होणार बंद

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 March 2020

बारामतीतून एकही एसटी बस रस्त्यावर येणार नसल्याची माहिती बारामती आगाराचे आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी दिली. 

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केलेले असल्याने रविवारी (ता. 22) बारामतीतून एकही एसटी बस रस्त्यावर येणार नसल्याची माहिती बारामती आगाराचे आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी दिली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शनिवारी रात्री बारा वाजल्यापासूनच एसटीची एकही बस रस्त्यावर येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. बारामती व बारामती एमआयडीसी या दोन्ही आगारांच्या मिळून 153 बसगाड्यांतून जवळपास दररोज 30 हजार प्रवाशांची वाहतूक केली जाते. बारामतीतून दररोज किमान 912 फे-या केल्या जातात. रविवारी एकही बस रस्त्यावर येणार नाही. 

दरम्यान, सोमवारपासूनही आवश्यकतेनुसार बस सोडल्या जाणार आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संख्या कमालीची घटल्याने मोकळ्या बस रस्त्यावर धावणे परिवहन मंडळाला न परवडणारे असल्याने तोटा सहन करुन या बसेस रस्त्यावर न आणण्याचे मंडळाचे धोरण आहे. 

Coronavirus: गायिका कनिका कपूरविरोधात गुन्हा दाखल 

पुरेशी प्रवासी संख्या असल्यास बस त्या मार्गावर सोडण्याचे ठरविण्यात आल्याचे अमोल गोंजारी यांनी सांगितले. 
दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी आज जिल्ह्यातील सर्वच सनियंत्रण अधिका-यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेत सर्वांशी संवाद साधला.

बारामतीत उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्यअधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी आजही सर्वत्र फिरुन परिस्थितीचा आढावा घेतला. बारामतीत कोरोनाबाधित एकही रुग्ण नसून सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याचे सांगितले. 

आज सलग दुस-या दिवशीही बारामती शहरातील सर्व दुकाने बंद होती. पुढील आदेश येईपर्यंत दुकाने उघडली जाणार नसल्याने अनेकांनी घरीच बसून आराम करणे पसंत केले. घराबाहेर पडू नका. हे प्रशासनाच्या वतीने केलेले आवाहन बारामतीकर पाळत असल्याचे आज दिसून आले. आज रस्ते ओस होते व वाहनांची वर्दळही थंडावली होती. पेट्रोल डिझेल विक्रीवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Buses will Stop due to Janata Curfew