एसटीच्या कंडक्‍टरकडून विद्यार्थ्यांना अरेरावी

राजकुमार थोरात
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

इंदापूर-बारामती एसटी बसच्या वाहकाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच, विद्यार्थ्यांचे घेतले पास उद्या (ता. 22) परत देण्यात येणार आहेत.
- एन. ए. मणेर, आगार व्यवस्थापक, इंदापूर

इंदापूर-सातारा बसमधून प्रवास करताना पास, ओळखपत्र काढून घेतले

वालचंदनग (पुणे): इंदापूर आगाराच्या इंदापूर-सातारा एसटीच्या वाहकाने (कंडक्‍टर) जंक्‍शन (ता. इंदापूर) येथे बसमधील विद्यार्थ्यांचे पास व ओळखपत्र अरेरावी करत जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना घडली.

निमगाव केतकी, गोतोंडी, शेळगाव, अंथुर्णे येथील अनेक विद्यार्थी वालचंदनगरमधील वर्धमान विद्यालयात शिक्षणासाठी येतात. इंदापूर ते वालचंदनगरपर्यंत बस कमी असल्यामुळे विद्यार्थी जंक्‍शनपर्यंत येऊन तेथून वालचंदनगर बसने प्रवास करतात. निमगाव केतकी, गोतोंडी व अंथुर्णे येथील आठ ते दहा विद्यार्थी आज सकाळी जंक्‍शनपर्यंत इंदापूर-सातारा बसमधून येत होते. त्या वेळी वाहकाने विद्यार्थ्यांना, तुम्हाला दुसऱ्या बसने येता येत नाही का, अशी अरेरावीची भाषा वापरून साहिल शिंदे, साक्षी साबळे, सिद्धी शिंदे, श्रेयस थोरात, श्रेयस माने, सानिका जाधव यांचे पास व ओळखपत्र जबरदस्तीने काढून घेतले. या वेळी बसमधील प्रवाशांनी वाहकाला विनंती करूनही विद्यार्थ्यांना पास दिले नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर विद्यार्थी दुसऱ्या बसने शाळेपर्यंत पोचले. झालेला प्रकार शिक्षकांना सांगितल्यानंतर शिक्षक पंकज पाटील, हनुमंत कुंभार यांनी एसटी महामंडळाच्या इंदापूरच्या आगाराकडे वाहकाची तक्रार केली आहे.

मनसेकडून निलंबनाची मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष भिसे यांच्याकडे पालकांनी तक्रार केल्यानंतर त्यांनी आगार व्यवस्थापकांशी चर्चा करून संबंधित वाहकाचे तातडीने निलंबन करण्याची मागणी केली. या संदर्भात भिसे यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांना विशेषकरून मुलींना शिक्षणासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. मात्र एसटीचे कर्मचारी स्व:च्या मालकीची बस असल्यासारखे वागत असून, बसमध्ये बसू नका, दुसऱ्या बसने या, अशी उत्तरे देत असल्याने मनमानी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगाम घालणे गरजेचे आहे.

Web Title: ST conductor and student issue at walchandnagar