'एसटी'च्या पाया पडणाऱ्या कंडक्टरचा फोटो व्हायरल; काय आहे यामागचे कारण?

महेश जगताप 
रविवार, 2 ऑगस्ट 2020

परिवहन महामंडळाने आम्हाला आयुष्य दिलं. आम्ही आयुष्यातील निम्म्यापेक्षा जास्त वेळ या एसटीमध्ये घालवला. त्यामुळे या परिवहन महामंडळापासून दूर जाताना त्रास होत आहे.

पुणे : ही कहाणी आहे एका सावंतवाडी मधील एकाच एसटीमध्ये वडील भगवान जाधव चालक आणि कंडक्टर म्हणून काम करीत असणारा मुलगा चंद्रशेखर जाधव यांची. परवाच चंद्रशेखर जाधव परिवहन महामंडळात ३८ वर्ष सेवा करून सेवानिवृत्ती घेतली. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. ज्या एसटीमध्ये आपण सबंध आयुष्य घातलं त्यासंबंधी कृतज्ञता व्यक्त करताना जाधव यांचा एसटीच्या पाया पडतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मैत्रीत आला दुरावा; स्टोरी काँग्रेसच्या राहुल ब्रिगेडची!​

'सकाळ'शी बोलताना चंद्रशेखर जाधव म्हणाले, ''माझे वडील १९६२ साली या परिवहन महामंडळामध्ये रुजू झाले. आमचं मूळ कुटुंब तसं सोलापूरमधील, पण सावंतवाडी डेपोमध्ये वडील चालक म्हणून सेवेत रुजू झाल्यानंतर सावंतवाडी हेच आमचं घर बनलं. त्यांनी जवळजवळ चाळीस वर्ष परिवहन महामंडळाची सेवा केली. ते १९९२ साली सेवानिवृत्त झाले. त्याच बरोबर मीही त्यांचा वारसा चालवताना १९८२ मध्ये मीही कंडक्टर म्हणून परिवहन महामंडळामध्ये सेवेत रुजू झालो. त्यानंतर आम्ही एकाच बसमध्ये ते चालक आणि मी कंडक्टर म्हणून कित्येक वेळा आम्ही सोबत प्रवास केला. या आठवणी मनाच्या कोपऱ्यात ठेवण्यासारख्या आहेत.

Image may contain: one or more people

"राफेलमध्ये बेरोजगारी आणि आर्थिक संकट दूर करण्याची क्षमता आहे का?"​

या परिवहन महामंडळाने आम्हाला आयुष्य दिलं. आम्ही आयुष्यातील निम्म्यापेक्षा जास्त वेळ या एसटीमध्ये घालवला. त्यामुळे या परिवहन महामंडळापासून दूर जाताना त्रास होत आहे. आज माझ्या मनात एस.टी.बद्दल अनेक आठवणी दाटून आल्या आहेत. आयुष्यात किती जणांना मी तिकीट दिले. या माध्यमातून किती जणांशी माझा संपर्क आला. अनेक प्रकारच्या   प्रवासींसोबत मलाही प्रवास करता आला त्याचे समाधान आहे. इतक्या वर्ष एसटीमध्ये प्रवास केला, पण अपघात नावाचा छोटा-मोठा कधीही प्रकार घडला नाही. त्याच्याशी निगडीत सबंध आयुष्यात गेलं. जवळ-जवळ आमच्या घरातील सत्तर वर्ष आम्ही या परिवहन महामंडळाशी जोडलो होतो. त्यामुळे आमच्या मनात एस.टी. विषयी मोठा आदर आहे. आत्ता यापुढची पिढी दुसऱ्या क्षेत्रात काम करीत असल्याने आम्हाला परिवहन मंडळापासून दूर गेल्यासारखं वाटत आहे. म्हणूनच मी सेवानिवृत्त होताना नारळ फोडला आणि तिच्या नतमस्तक झालो, अशा भावना जाधव यांनी व्यक्त केल्या.

Image may contain: one or more people, people standing, bus and outdoor

डिप्लोमाच्या प्रवेशाला मुहूर्त सापडेना; वेळापत्रकाकडे लागले विद्यार्थ्यांचे लक्ष!

एक परिवहन महामंडळाचा कर्मचारी एस.टी.चा इतका सन्मानपूर्वक निरोप घेतो. हे क्वचितच आपणाला पाहायला मिळते. ज्या सेवेने आपणाला एक चांगले आयुष्य दिले, त्याबाबद्दल जाधव पाया पडताना फोटो व्हायरल झाल्याने राज्यातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. जाधव कुटुंबीय गेल्या सत्तर वर्षापासून एस.टी.शी जोडले गेल्याने जाधव सेवानिवृत्त होताना सबंध कुटुंबच खूप भावनिक झाले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Conductor Jadhav expressing gratitude for ST the photo has gone viral on social media