एसटी महामंडळात चालक-वाहकांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी'

दीपेश सुराणा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

"एसटी आगारातील चालक, वाहक व कामगार यांना चांगली पुस्तके वाचनासाठी उपलब्ध व्हावी, यासाठी "ग्रंथालय आपल्या दारी' हा उपक्रम हाती घेतला आहे. कामगारांनी वाचन केल्यास त्यांच्या जीवनात नक्कीच चांगले परिवर्तन घडू शकेल. ग्रंथालयातील 15 हजार पुस्तकांचा संबंधितांना लाभ घेता येणार आहे.'' 

- जगन्नाथ नेरकर, संस्थापक-अध्यक्ष, सोहम ग्रंथालय 

पिंपरी : वाचन चळवळीला गती मिळावी, या उद्देशाने एसटी महामंडळात चालक, वाहक आणि कामगारांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम पहिल्यांदाच सोहम सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्यातर्फे हाती घेण्यात आला आहे. 

एसटी महामंडळातील चालक, वाहक व कामगार हे एसटीच्या विविध फेऱ्यांनिमित्त सतत फिरस्तीवर असतात. त्यांच्या ज्ञान वृद्धीसाठी वाचन चळवळीचा एक भाग म्हणून सोहम ग्रंथालयाच्या वतीने विविध पुस्तके वाचनासाठी देण्यात येणार आहेत. कामगारांना थेट डेपोमध्ये ही पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. त्यासाठी त्यांना सोहम ग्रंथालयातर्फे आवश्‍यक पुस्तकांचे एक कपाट देण्याचे नियोजन आहे. कामगार स्वतः: देखील संत तुकारामनगर येथील विरंगुळा केंद्रात असलेल्या सोहम ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचनासाठी घेऊन जाऊ शकतील. या अनोख्या उपक्रमामुळे एसटी महामंडळाच्या चालक व वाहक यांच्यात वाचनाची अभिरुची निर्माण होणार आहे. या उपक्रमाची सुरवात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शाखा अध्यक्ष राजन लाखे, कामगार कल्याण मंडळाचे (वल्लभनगर) केंद्र संचालक सुरेश पवार यांच्या हस्ते झाली. 

"सध्या आधुनिकीकरणात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. अशा परिस्थितीत चालक, वाहक आणि कामगार यांच्या विचारांना चालना देण्यासाठी हा उपक्रम स्तुत्य आहे. त्याचा फायदा कामगारांना होणार आहे.'' 

- एस.एन.भोसले, आगार व्यवस्थापक, वल्लभनगर एसटी बस आगार 

"जेटयुगात व्यक्तीला विविध व्याधी जडल्या आहेत. त्यावर हे पुस्तक रामबाण उपाय आहे. पुस्तक वाचनासाठी वेळ दिल्यास एसटी कामगारांना त्याचा निश्‍चितच उपयोग होणार आहे.'' 

- आर. टी. जाधव, वरिष्ठ लिपिक, वल्लभनगर एसटी बस आगार 

Web Title: ST Corporation drivers and conductor carriers your library