एसटी स्थानकांतून पळवतात प्रवासी

सचिन बडे
बुधवार, 23 जानेवारी 2019

पुणे - राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांमधून खासगी वाहनचालक प्रवासी पळवीत असल्याने ‘एसटी’चे कंबरडे मोडण्याची वेळी आली आहे. आगारांच्या परिसरात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी असूनही बेकायदेशीर वाहतूक सुरूच असल्याचे पाहणीतून दिसून आले. अशा वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याकडे पोलिस अधिकारी काणाडोळा करीत असल्याने एसटीचे उत्पन्न ३० टक्‍क्‍यांनी घटल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात येते. त्यासंदर्भात पोलिसांना पत्रव्यवहारही केला जातो, असे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, या तक्रारींना पोलिस अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याचे एसटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट व शिवाजीनगर बस स्थानकाबाहेर खासगी वाहतूकदार बिनदिक्‍क्‍तपणे बेकायदा वाहतूक करतात. कायद्यानुसार एसटी स्थानकाच्या २०० मीटर हद्दीमध्ये खासगी वाहतूक करण्यास बंदी आहे. मात्र, शहरातील एसटी स्थानकामध्ये येऊन कमी दर आणि जलद प्रवासाचे प्रलोभन दाखवून प्रवाशांना नेण्यात येते.

दरम्यान, बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांना जाब विचारल्यास एसटीच्या अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरली जाते, दमही भरला जातो. यासंदर्भात पोलिस आयुक्तालयासही पत्र दिले आहे. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे पुणे रेल्वे स्टेशन येथील आगाराचे प्रमुख अनिल भिसे यांनी सांगितले.

एसटी स्थानकांच्या बाहेर बेकायदा खासगी वाहतुकीबाबत पोलिसांशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात येत आहे. एसटीचे कर्मचारी गाड्यांचे क्रमांक, वाहतूकदारांची नावे पोलिसांना देतात.  
- यामिनी जोशी, पुणे विभागीय व्यवस्थापक, राज्य परिवहन महामंडळ 

खासगी वाहतुकीबाबत आमच्याकडे येणाऱ्या तक्रारींची दखल घेत संबंधितांवर कारवाई करतो. आमच्याबरोबर वाहतूक पोलिसही कारवाई करतात. मात्र, कारवाई केल्यानंतर दोन दिवसांत पुन्हा खासगी वाहतूक सुरू होते.
- एम. एम. मुजावर, पोलिस निरीक्षक, बंडगार्डन पोलिस स्टेशन

Web Title: ST Depo Passenger