भोरच्या नागरिकांसाठी लालपरी सेवेत दाखल... 

विजय जाधव
शनिवार, 23 मे 2020

राज्य परिवहन विभागाच्या भोर आगाराने लॉकडाउननंतर प्रथमच शनिवारी (ता. 23) एसटीची सेवा सुरू केली.

भोर (पुणे) : राज्य परिवहन विभागाच्या भोर आगाराने लॉकडाउननंतर प्रथमच शनिवारी (ता. 23) एसटीची सेवा सुरू केली.

शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता भोर- पांगारी गाडी मार्गस्थ झाली. त्यानंतर महुडे, मळे- भूतोंडे व चिखलगाव आदी गाड्या सुरू करण्यात आल्या. सरकारच्या नियमानुसार प्रत्येक गाडीत सोशल डिस्टन्स ठेवण्यात येत असून, एका गाडीत जास्तीत जास्त 23 प्रवासी क्षमता ठेवण्यात आली आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक बी. एम. सूर्यवंशी यांनी दिली. 

बारामतीत एसटीचे चाक लॉकडाउनमुळे रुतले, 15 कोटींचे नुकसान  

भोर आगारातील एसटीच्या 60 गाड्या, 120 चालक आणि 99 वाहक कार्यरत आहेत. कोरोनाचे रेडझोन वगळता इतर झोनच्या ठिकाणी गाड्या सुरू करण्यात आल्या. लॉकडाउननंतर शनिवारी एसटीच्या सेवेचा पहिलाच दिवस आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या तुरळक असल्याचे एसटीचे वाहतूक निरीक्षक सचिन कुंभार यांनी सांगितले. 

सासवडकरांचे टेन्शन वाढले, शहराजवळील गावात कोरोनाचा रुग्ण  

भोर तालुक्‍यातील इतर ठिकाणीही टप्प्याटप्प्याने एसटीची सेवा सुरू केली जाणार आहे. दहा वर्षाखालील मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीने प्रवास करण्यास परवानगी नाही. त्यामुळे वय वर्षे 11 ते 59 या वर्षांच्या नागरिकांनाच एसटीने प्रवास करता येणार आहे. एसटीच्या प्रवासभाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. एसटीची क्षमता 23 प्रवाशांची केली असली, तरीही प्रवासभाडे हे पूर्वीप्रमाणेच स्टेजसाठी 7 रुपये 75 पैसे राहणार आहे. प्रवासापूर्वी एसटीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून, प्रत्येक फेरीनंतर संबंधित एसटी सॅनिटाइज करण्यात येणार आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एसटी सेवा सुरू करण्यावेळी आगार व्यवस्थापक सूर्यवंशी, वाहतूक निरीक्षक सचिन कुंभार, राजेंद्र भेलके, पोपट धुमाळ, शरद गायकवाड आदींसह प्रवासी उपस्थित होते. प्रवाशांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे असल्याचे आगाराकडून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST service started in Bhor taluka