शेतकऱ्यांना भरावे लागणार मुद्रांक शुल्क

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

पुणे - विशेष नगर वसाहतींमध्ये समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्यांना विकसकाबरोबर करार केल्यानंतर आर्थिक अथवा भागीदारी स्वरूपात मिळणाऱ्या मोबदल्यावरदेखील आता मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाने स्वतंत्र फॉर्म्युला तयार केला आहे. या निर्णयामुळे अशा वसाहतींच्या विकसनासाठी होणाऱ्या करारनाम्यात सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे.

हडपसर येथील मगरपट्टा सिटीनंतर शेतकऱ्यांना एकत्र करून विशेष नगर वसाहती उभारण्याचे अनेक प्रकल्प राज्यात सुरू आहेत. अशा प्रकल्पांमध्ये सर्व जागामालक भागधारक असलेली कंपनी स्थापन केली जाते. सर्व जागामालकांच्या जागा एकत्र करून त्यांच्या क्षेत्राच्या प्रमाणात त्यांना कंपनीचे समभाग अथवा उत्पन्नाचा हिस्सा दिला जातो. तर काही प्रकल्पांमध्ये जागामालकांना थेट रक्कम दिली जाते. अशा प्रकल्पात जागामालक आणि विकसक कंपनीला जागा विकसनासाठी देताना जो संयुक्त विकसन करारनामा करतात, त्यावर मुद्रांक शुल्क किती आकारावे, याबाबतची कार्यपद्धती आतापर्यंत निश्‍चित नव्हती. ती प्रथमच मुद्रांक शुल्क विभागाकडून निश्‍चित करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी काढले आहेत.

यापूर्वी असे प्रकल्प झाले असल्यास त्यांनाही पूर्वलक्षी प्रभावाने ते शुल्क लागू करावेत, अशा सूचना कवडे यांनी राज्यातील सर्व दुय्यम निबंधकांना दिल्या आहेत.

मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाने काढलेल्या या परिपत्रकामुळे मुद्रांक शुल्काची आकारणी करण्यात सुसूत्रता आणि पारदर्शकता येणार आहे. यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये दुय्यम निबंधकांचा वेगवेगळा दृष्टिकोन असायचा. पुढे जाऊन लेखापरीक्षणामध्ये काही त्रुटी दिसून आल्या, की त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत होता. तो त्रास आता होणार नाही.
- सतीश मगर,  व्यवस्थापकीय संचालक, मगरपट्टा सिटी

Web Title: Stamp duty to be paid to the farmers