नोटाबंदीनंतर दस्तनोंदणीत लक्षणीय वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

मार्चअखेर 19 लाख 14 हजार दस्तांची नोंदणी; मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाची माहिती

मार्चअखेर 19 लाख 14 हजार दस्तांची नोंदणी; मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाची माहिती
पुणे - गतवर्षीच्या नोव्हेंबरमध्ये नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील दस्तनोंदणीत घट झाली होती. परंतु, जानेवारीमध्ये बॅंकांचे व्यवहार सुरळीत झाले. तसेच, अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर बाजारपेठांमधील अनिश्‍चितता दूर झाल्यामुळे नोटाबंदीनंतर दस्तनोंदणीत मार्चमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मार्चअखेरीस राज्यात 19 लाख 14 हजार 10 दस्तांची नोंदणी झाली असून, सुमारे 17 हजार कोटींपेक्षा जास्त महसूल राज्याच्या तिजोरीत जमा झाला आहे.

राज्य मुद्रांक व नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार, गतवर्षी 2015-16 मध्ये राज्यात 23 लाख 8 हजार 809 दस्तनोंदणी झाली होती. त्यातून जवळपास 21 हजार 767 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. गतवर्षाच्या तुलनेत गेल्या चार महिन्यांमध्ये दस्तनोंदणीत लक्षणीय वाढ झाली. त्यानुसार मार्चअखेर 2 लाख 52 हजार 594 दस्तनोंदणी झाल्या असून, सुमारे 278 कोटींपेक्षा जास्त महसूल जमा झाला आहे. परिणामी, नोटाबंदीनंतर आर्थिक वर्ष संपत असताना दस्तनोंदणीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 2016 मधील नोव्हेंबर महिन्यात 1 लाख 20 हजार, तर डिसेंबरमध्ये 1 लाख 18 हजार 550 दस्तनोंदणी झाली. तर, 2017 जानेवारीत 1 लाख 98 हजार 450, फेब्रुवारीत 1 लाख 91 हजार 383, तर मार्चअखेर 2 लाख 52 हजार 594 दस्तनोंदणी झाली. त्यातून मार्चअखेरीस 17 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल राज्य सरकारच्या तिजोरीत जमा झाला.

मागील चार वर्षांमधील आकडेवारी
वर्ष दस्तनोंदणी जमा महसूल

2013-14 23 लाख 30 हजार 373 18 हजार 661 कोटी रु.
2014-15 22 लाख 97 हजार 929 19 हजार 959 कोटी रु.
2015-16 23 लाख 8 हजार 809 21 हजार 767 कोटी रु.
2016-17 19 लाख 64 हजार 594 17 हजार कोटीपेक्षा जास्त (मार्चअखेर)

Web Title: stamp registration increase after currency ban