दस्तनोंदणी साक्षीदाराविना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

खरेदी आणि विक्री करणाऱ्या व्यक्तींच्या आधार कार्डद्वारे दस्तनोंदणीची सुविधा नोंदणी विभागाने उपलब्ध करून दिली आहे. अधिकाधिक नागरिकांनी याचा वापर करावा, अशा सूचना दुय्यम निबंधकांना देण्यात आल्या आहेत. 
- अनिल कवडे, नोंदणी महानिरीक्षक 

पुणे - मालमत्तेच्या खरेदी-विक्रीची दस्तनोंदणी करताना आता साक्षीदारांची गरज असणार नाही. खरेदी आणि विक्री करणाऱ्यांकडे आधार कार्ड असेल, तर दस्तनोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल. या सुविधेमुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांचा वेळही वाचेल.

दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी करताना आधार कार्ड असेल, तर साक्षीदाराची आवश्‍यकता नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. खरेदी आणि विक्री करणाऱ्या व्यक्तींची आधार क्रमांकावरून ओळख पटविण्यासाठी इंटरनेटऐवजी नोंदणी विभागाच्या स्वतंत्र प्रणालीला ही सेवा देण्याचा प्रस्ताव नोंदणी विभागाने भारतीय नागरिकांक प्राधिकरणाकडे (यूआयडीएआय) सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यामुळे दस्तनोंदणी करताना साक्षीदाराची आवश्‍यकता असणार नाही.

आधारची सत्यता पडताळण्यासाठी बायोमेट्रिक मशिनद्वारे अंगठ्याचे ठसे घेतले जातील. इंटरनेटद्वारे या ठशांचे नमुने ‘यूआयडीएआय’च्या सर्व्हरवर जाऊन पडताळणी करण्यात येईल. यासाठी इंटरनेट हे माध्यम महत्त्वाचे आहे. मात्र, नोंदणी विभागाने इंटरनेटसाठी स्वतंत्र ‘एमपीएलएसव्हीपीएन’ हे स्वतंत्र नेटवर्क वापरले जाते. या नेटवर्कमुळे डेटा हा सुरक्षित राहतो. 

यापूर्वी दस्तनोंदणी करताना दुय्यम निबंधकांसमोर साक्षीदारांना आणणे, त्यांच्या अंगठ्याचे ठसे घेणे, छायाचित्र, हमीपत्र आणि स्वाक्षरी घेणे, ही प्रक्रिया करावी लागत होती. मात्र, आधारमुळे साक्षीदार शोधणे, त्याला दस्तनोंदणी होईपर्यंत थांबविणे, यातून नागरिकांची सुटका झाली 
आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stamp Registration without a witness