स्थायीचा अर्थसंकल्प १० किंवा ११ मे रोजी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

पुणे - महापालिकेच्या स्थायी समितीचा अर्थसंकल्प १० किंवा ११ मे रोजी मांडला जाणार आहे. महापौर मुक्ता टिळक परदेश दौऱ्यावर जाणार असल्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर होणार आहे. 

पुणे - महापालिकेच्या स्थायी समितीचा अर्थसंकल्प १० किंवा ११ मे रोजी मांडला जाणार आहे. महापौर मुक्ता टिळक परदेश दौऱ्यावर जाणार असल्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर होणार आहे. 

महापालिकेचे नवे सभागृह अस्तित्वात आल्यावर आयुक्त कुणाल कुमार यांनी ३० मार्च रोजी ५६०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ सध्या अर्थसंकल्प तयार करत आहेत. महापालिका आयुक्त परदेश दौऱ्यावरून ३० एप्रिल रोजी परतणार आहेत; परंतु १ मे रोजी महापालिकेला महाराष्ट्र दिनाची सुटी आहे. त्यामुळे ते २ मे रोजी महापालिकेत रुजू होतील. तर त्याचदरम्यान केंद्र सरकारच्या एका उपक्रमाअंतर्गत महापौर मुक्ता टिळक २ मेपासून परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्या ७ मे रोजी परतणार आहेत. त्यामुळे अर्थसंकल्प १० किंवा ११ मे रोजी मांडला जाईल, असे सूत्रांनी नमूद केले. 

अर्थसंकल्पाची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिकेचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प शहरात सुरू आहेत. त्यासाठी आयुक्तांच्या या अर्थसंकल्पात खास तरतुदी आहेत. नव्या घोषणा किंवा प्रकल्पांपेक्षा सुरू असलेले प्रकल्प वेगाने पार पडतील, यासाठी आयुक्तांनी अधिक लक्ष दिले आहे. भांडवली कामांसाठी त्यात सुमारे १८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सभागृहात भाजपचे यंदा स्पष्ट बहुमत आहे. एरवी मध्यभागातील प्रभागांसाठी अधिक तरतूद उपलब्ध होते; परंतु या वेळी संपूर्ण शहराचा विचार करून प्रत्येक प्रभागासाठी पुरेशी तरतूद करण्याचा प्रयत्न आहे, असे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

लवकरच आराखडा निश्‍चित 
जायका, मेट्रो, स्मार्ट सिटी, एचसीएमटीआर, पीएमपीची बस खरेदी, रिंगरोड, दौंड- लोणावळा लोकल, ॲमिनिट स्पेसचा वापर आदींबाबत धोरणात्मक निर्णय होऊन त्यांची पुढील काही वर्षे अंमलबजावणी करण्याबाबतचा आराखडा निश्‍चित होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

घोषणांचे प्रतिबिंब?
महापालिकेत भाजपची स्वबळावर सत्ता आल्यानंतर सादर होणारा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक प्रचारात पक्षाने केलेल्या घोषणांचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटावे, यासाठी पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले तसेच अन्य लोकप्रतिनिधी आग्रही आहेत. त्यासाठी पदाधिकाऱ्यांशी लवकरच त्यांची बैठक होणार आहे.

Web Title: standing committee budget