स्थायी समिती अध्यक्षपदी सीमा सावळे निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

पिंपरी - महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांचे निवड निश्‍चित आहे. समितीच्या १६ सदस्यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक, तसेच सर्वांत ज्येष्ठ, अनुभवी आणि आक्रमक नगरसेवक म्हणून सावळे यांच्या नावावर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व वरिष्ठांनी शिक्कामोर्तब केल्याचे समजते.

पिंपरी - महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांचे निवड निश्‍चित आहे. समितीच्या १६ सदस्यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक, तसेच सर्वांत ज्येष्ठ, अनुभवी आणि आक्रमक नगरसेवक म्हणून सावळे यांच्या नावावर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व वरिष्ठांनी शिक्कामोर्तब केल्याचे समजते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर सर्व प्रथम गटनेतेपदी ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून एकनाथ पवार यांची निवड करण्यात आली. त्या वेळी ज्येष्ठ म्हणून सीमा सावळे यांचे नाव आघाडीवर होते. पवार यांचे नाव गटनेतेपदी आले. त्याच वेळी स्थायी समिती अध्यक्षपदी सावळे यांचे नाव येणार, असे अनुमान होते. त्यानंतर भाजपच्या प्रथम महापौरपदा-साठीही मोठी चढाओढ होती. तिथे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे खंदे समर्थक नितीन काळजे यांना संधी देण्यात आली. या पदासाठीही नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, असे अन्य स्पर्धक होते. आमदार लांडगे यांनी प्रतिष्ठेचा प्रश्‍न केल्याने अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सांगण्यानुसार काळजे यांचे नाव महापौरपदासाठी कायम झाले. उपमहापौर पदावर भाजपच्या निष्ठावंत आणि ग्वाल्हेरच्या सरदार घराण्यातील म्हणून शैलजा मोरे यांची निवड करण्यात आली. महापालिकेतील अत्यंत महत्त्वाचे पद म्हणून स्थायी समिती अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याबाबत उत्सुकता होती.

समितीच्या १६ सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत जाणकार आणि मुरब्बी असे राजू मिसाळ, मोरेश्‍वर भोंडवे, वैशाली काळभोर यांचा समावेश असल्याने विरोधकांना सामना करू शकेल, असाच अध्यक्ष असावा म्हणून सावळे यांना संधी देण्यात आली आहे. सावळे यांच्या नावावर आता पुढील आठवड्यात समितीच्या सभेत शिक्कामोर्तब होणार आहे.

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांवर सावळे यांनी प्रकाश टाकला. झोपडपट्टी पुनर्वसन, स्वस्त घरकुल, सीएनजी गॅस शवदाहिनी, चव्हाण रुग्णालयातील एचबीओटी मशिन खरेदी, विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्ती घोटाळा आदी विषय त्यांनी गाजवले. या सर्व प्रकरणांमुळे जनमत फिरले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाला. भाजपच्या वरिष्ठांनी या प्रकरणांची गंभीर दखल घेतली आणि दोषींवर कारवाईचे संकेत दिले आहेत. किमान यापुढील काळात महापालिकेच्या तिजोरीतून एका पैशाचाही भ्रष्टाचार होऊ नये, या उद्देशाने सावळे यांच्या हाती महापालिका तिजोरीच्या चाव्या सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही सांगण्यात आले.

Web Title: standing committee chairman seema savale