सावळे यांची बिनविरोध निवड निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, त्यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे. 

शुक्रवारी (ता. ३१) स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. साखर आयुक्त डॉ. बिपीन शर्मा हे पीठासन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्या बैठकीत सावळे यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा करण्यात येईल.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, त्यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे. 

शुक्रवारी (ता. ३१) स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. साखर आयुक्त डॉ. बिपीन शर्मा हे पीठासन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्या बैठकीत सावळे यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा करण्यात येईल.

सावळे यांनी नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. या वेळी आमदार व शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे, माजी महापौर आझमभाई पानसरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, प्रदेश सदस्या उमा खापरे, नगरसेविका आशा शेंडगे, नगरसेवक नामदेव ढाके, हर्षल ढोरे तसेच भाजपचे स्थायी समिती सदस्य उपस्थित होते.

स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी भाजपचे सर्वाधिक १०, राष्ट्रवादीचे ४, शिवसेना आणि अपक्षांचा प्रत्येकी १ सदस्य आहे. भाजपला निर्विवाद बहुमत आहे. त्यामुळे निवडणूक झाली असती तरीही भाजपच्या सावळे यांचा विजय निश्‍चित होता.

पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस स्थायी समितीची निवडणूक लढणार नसल्याचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी यापूर्वीच जाहीर केले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभा न केल्यामुळे सावळे यांची बिनविरोध निवड निश्‍चित आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी नगरसेविका सीमा सावळे यांचे नाव एकमताने निश्‍चित केले आहे. पक्षामध्ये गट-तट नाहीत. पद देताना विधानसभानिहाय विचार न करता पिंपरी-चिंचवड शहर म्हणूनच आम्ही विचार करीत आहोत. 
- आमदार लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भाजप

दलित समाजाच्या आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या रणरागिणीला भाजपने स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी संधी देऊ केली आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी सोमवारी दुपारी सीमा सावळे यांचे नाव कळविले.
- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेता

महापालिकेत भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक, स्वच्छ कारभार हा भाजपचा अजेंडा कटाक्षाने राबविणार आहे. आजवरचे टक्केवारीचे राजकारण पूर्णतः मोडीत काढण्याचा प्रयत्न राहील. जनतेच्या गरजेनुसार विकासकामे होतील. अनावश्‍यक खर्च, उधळपट्टीला लगाम लावणार.
- सीमा सावळे

पारदर्शकतेकडे लक्ष
सावळे या इंद्रायणीनगर प्रभागातून तिसऱ्यांदा निवडून आल्या. स्थायी समितीतील सर्वांत ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांना अध्यक्षपदाचा मान देण्यात आला. यापूर्वी दोनदा त्या शिवसेनेकडून निवडून आल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी त्या भाजपमध्ये सामील झाल्या आणि मोठ्या फरकाने विजयी झाल्या. आतापर्यंत सतत स्थायी समितीतील भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या सावळे यांच्या हातात आता पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या येणार असल्यामुळे आता त्या किती पारदर्शक कारभार करतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: standing committee chairman seema savale