सावळेंच्या हाती तिजोरीच्या चाव्या

सावळेंच्या हाती तिजोरीच्या चाव्या

महापालिकेतील पहिल्या मागासवर्गीय महिला अध्यक्षा

पिंपरी - महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शुक्रवारी नगरसेविका सीमा सावळे यांची बिनविरोध निवड झाली. भाजपच्या पहिल्या व महापालिकेतील  पहिल्या मागासवर्गीय महिला अध्यक्षा होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. साखर आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी विशेष स्थायी समिती सभेत ही बिनविरोध निवड जाहीर केली.

सावळे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची अध्यक्षा म्हणून डॉ. शर्मा यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. महापालिकेत १९८६-८७ ला काँग्रेसची सत्ता आली. त्या वेळी काँग्रेसकडून पहिले अध्यक्षा होण्याचा मान बाबासाहेब तापकीर यांना मिळाला, तर तब्बल ३१ वर्षांनी प्रथमच महापालिकेत भाजपची सत्ता आली. भाजपच्या पहिल्या स्थायी समिती अध्यक्षा म्हणून सावळे यांना संधी मिळाली आहे. 

टक्का काय असतो?
महापालिका स्थायी समिती सभेत मिळणाऱ्या टक्केवारीबाबत त्या म्हणाल्या, ‘‘मी टक्केवारीपासून दूर आहे. टक्का काय असतो हे मला अजून तरी माहिती नाही.’’ 

कार्यकर्त्यांचा जल्लोष
स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सीमा सावळे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ 
देऊन आणि पेढे भरवून आनंद व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी महापालिका भवनासमोर ढोल-ताशांचा निनाद केला. फुलांची उधळण करत फटाक्‍यांची आतषबाजी केली.

रिसेप्शनिस्ट ते स्थायी समिती अध्यक्षा
सीमा सावळे यांची वाटचाल ही रिसेप्शनिस्ट ते स्थायी समिती अध्यक्षा... अशी राहिली आहे. विदर्भातील वाशीम जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण आश्रमशाळेत; तर महाविद्यालयीन शिक्षण अमरावती शहरातील महिला महाविद्यालयात झाले. कला शाखेच्या द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण घेऊन त्यानंतर त्यांनी फूड प्रिझर्वेशनमध्ये पदविका प्राप्त केली. १९९२ मध्ये अमरावतीहून त्या पिंपरी-चिंचवड शहरात कामानिमित्त आल्या. त्यांनी सुरवातीला एमआयडीसीमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काही वर्षे काम केले. राजकीय जीवनात १९९७ मध्ये शिवसेनेने त्यांना महापालिका निवडणुकीसाठी महिला प्रचारप्रमुख म्हणून नेमले. महापालिकेच्या २००७ आणि २०१२ अशा दोन निवडणुकांमध्ये त्या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या; तर यंदा प्रथमच भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन त्यांच्या गळ्यात स्थायी समिती अध्यक्षपदाची माळ पडली आहे.

सावळे म्हणाल्या...
गॅस शवदाहिनी व विठ्ठल-मूर्ती घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई
चुकीच्या कामांना नसेल पाठिंबा; वेळप्रसंगी राहणार विरोधकांच्या भूमिकेत 
महापालिकेच्या तिजोरीत जमा होणाऱ्या प्रत्येक रुपयाचा विनियोग योग्य पद्धतीने करण्यावर भर
अनावश्‍यक कामांना कात्री; उधळपट्टीला लगाम
पालिका उत्पन्न वाढीसाठी नवीन स्रोत शोधणार
पारदर्शक आणि प्रामाणिक कारभारावर भर
वाढीव खर्चाबाबत शहानिशा करूनच प्रकल्पांचे काम, जुन्या प्रकल्पांचे पुनर्वलोकन 

नागरी सुविधांना प्राधान्यक्रम
केंद्रीय संरक्षणमंत्र्यांनी रेड झोनची हद्द कमी केल्यास पेठ क्रमांक २२ मधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला नसेल विरोध
पीएमपी व शहराबाबत नागरिकांकडून मिळणाऱ्या तक्रारींचे करणार निराकरण
पवना धरणातून थेट पाणी उचलण्याच्या योजनेबाबत स्थानिक शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊनच निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com