"स्थायी'साठी नगरसेवकांची धावपळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

पुणे - महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर आता स्थायी समितीवर वर्णी लावण्यासाठी भारतीय जनता पक्षासह महापालिकेतील सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांची धावपळ सुरू झाली आहे. भाजपमधील जुन्या-नव्या नगरसेवकांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्‍यता आहे; तर रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) आपल्या दोन नगरसेवकांना समितीवर घेण्याची मागणी लावून धरली आहे. 

महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक 98 जागा मिळविलेल्या भाजपने महापौर आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांची नावे घोषित करून त्यासाठी उमेदवारी अर्जही दाखल केले. या दोन्ही पदांसाठी येत्या बुधवारी (ता.15) निवडणूक होणार आहे. त्यापाठोपाठ स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. त्यासाठी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी फिल्डिंग लावली आहे. समितीवर पहिल्याच वर्षी वर्णी लागावी यासाठी भाजपचे अनेक नगरसेवक प्रयत्नशील आहेत. तसेच अन्य राज्य पक्षांमधील नगरसेवकही आपापल्या पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन समितीचे सदस्यत्व पद पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

स्थायी समितीतील 16 पैकी दहा सदस्य भाजपचे राहणार असून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला चार जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापाठोपाठ कॉंग्रेस आणि शिवसेनेतील प्रत्येकी एक नगरसेवकाची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आतापासून या राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी फिल्डिंग लावली आहे. त्यात उपमहापौरपद दिल्यानंतर "आरपीआय'ने समितीसाठी दावा केला असून, दोघा नगरसेवकांना समितीचे सदस्यपद देण्याची मागणी भाजपकडे केली आहे. 

दरम्यान, भाजपने महापौरपद कसबा, तर सभागृहनेतेपद पर्वती विधानसभा मतदासंघातील नगरसेवकाला दिले आहे. त्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्षपद कोथरूड मतदारसंघातील नगरसेवकाला दिले जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: standing committee election