ताऱ्यांच्या निर्मितीचा दर  ४ अब्ज वर्षांपासून सारखाच

ताऱ्यांच्या निर्मितीचा दर  ४ अब्ज वर्षांपासून सारखाच

पुणे - पृथ्वीपासून चार अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगेतील सरासरी वायू स्थिरांक (गॅस कॉन्स्टंट) संशोधकांनी यशस्वीरीत्या मिळवला आहे. निरीक्षणे घेण्यात आलेल्या या आकाशगंगेचे वय हे ब्रह्मांडाच्या सध्याच्या वयाच्या दोन तृतीयांश वयाएवढे आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार अब्ज वर्षांपासून आकाशगंगेमध्ये नवीन तारे निर्माण होण्याच्या दरात फार काही बदल झाला नसल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

नारायणगाव जवळील खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) या महाकाय दुर्बिणीच्या साह्याने ही निरीक्षणे घेण्यात आली. पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (एनसीआरए) आणि मोहालीतील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे हे संशोधन केले आहे. एनसीआरएमधील संशोधक विद्यार्थी अपूर्बा बेरा, प्रा. जयराम चेंगलूर आणि मोहालीतील प्रा. जसजीत सिंग बाग्ला यांचे हे संशोधन अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. काळानुरूप तारे आणि त्याभोवतीच्या वायुंमध्ये होणाऱ्या बदलांतून आकाशगंगेची निर्मिती कशी होते हे आपल्याला कळते. आकाशगंगेमध्ये वायूंच्या ढगांपासून नवीन तारा निर्माण होण्याचा दर शोधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ मागील दोन दशकांपासून करत आहेत. ही निर्मिती प्रक्रिया उलगडणाऱ्या वायू स्थिरांकाबद्दल फार थोडी माहिती शास्त्रज्ञांकडे आहे. या नव्या संशोधनामुळे त्यात मोठी भर पडणार आहे.

संशोधक बेरा म्हणाले, ‘‘आकाशगंगेतील बहुतेक वायू हे हायड्रोजनच्या स्वरूपात आढळतात. त्यांच्यातून २१.११ सेंटिमीटरच्या रेडिओ लहरी उत्सर्जित होतात. दुर्दैवाने या लहरी अत्यंत क्षीण असतात. जीएमआरटीसारखी रेडिओ दुर्बीणही हजारो प्रकाशवर्षे दुरून येणाऱ्या या लहरींचा संग्रह करू शकत नव्हती. परंतु, नव्याने अद्ययावत करण्यात आलेल्या ‘यू-जीएमआरटी’ने ही निरीक्षणे घेणे शक्‍य झाले आहे.’’ 

शेकडो आकाशगंगांची एकाच वेळी निरीक्षणे घेतल्यावरच हे संशोधन शक्‍य झाले आहे. अद्ययावत करण्यात आलेल्या जीएमआरटीमुळे आम्हाला ही निरीक्षणे घेता आली. एकाच वेळी चारशे आकाशगंगांची निरीक्षणे ही दुर्बीण घेते.’’
- प्रा. जयराम चेंगलुरू, एनसीआरए

वायूच्या ढगांचा अभ्यास
ताऱ्यांना प्रकाशमान करण्याचे काम हायड्रोजन स्वरूपातील इंधन करते. हायड्रोजन वायूचे महाकाय आणि वजनदार ढग एकत्र आले की त्यातून ताऱ्याची निर्मिती होते. या ताऱ्यांतूनच मूलद्रव्यांची पर्यायाने ग्रह, उपग्रह आणि सूर्यमालेची निर्मिती होते. विश्‍वनिर्मितीची प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर, ताऱ्यांची निर्मिती करणाऱ्या हायड्रोजन वायूच्या ढगांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. यातील महत्त्वपूर्ण घटक हा वायू स्थिरांक आहे. ज्याची किंमत ८.३१४५ ज्युल प्रती मोल केल्विन ऐवढी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com