आता लढाई आमची सुरू... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पुणे - तिकीट मिळविण्याच्या स्पर्धेत विजयी झाल्यानंतर पुढच्या लढाईसाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. रविवारचे निमित्त साधून अनेकांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. ऐनवेळी पक्षबदल केल्यामुळे अनेकांवर झेंड्यांपासून ते परिचय पत्रकापर्यंत अनेक गोष्टींत बदल करण्याची वेळ आल्याने समर्थकांसह उमेदवारांचा रविवार काहीसा धावपळीचा राहिला. 

पुणे - तिकीट मिळविण्याच्या स्पर्धेत विजयी झाल्यानंतर पुढच्या लढाईसाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. रविवारचे निमित्त साधून अनेकांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. ऐनवेळी पक्षबदल केल्यामुळे अनेकांवर झेंड्यांपासून ते परिचय पत्रकापर्यंत अनेक गोष्टींत बदल करण्याची वेळ आल्याने समर्थकांसह उमेदवारांचा रविवार काहीसा धावपळीचा राहिला. 

सर्वच राजकीय पक्षांत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांत मोठी स्पर्धा होती. या स्पर्धेत टिकून राहून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांची दमछाक झाली. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अनेकांना ऐनवेळी अन्य पक्षात उडी मारावी लागली. तिकीट मिळण्याच्या स्पर्धेत यश मिळत नाही, तोच शनिवारचा संपूर्ण दिवस छाननीमध्ये गेला. तर अनेकांना रविवारमुळे दिलासा मिळाला. या दिवसाचे निमित्त साधून अनेकांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. कोणी प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन, तर कोणी पदयात्रा काढली. काही उमेदवारांनी प्रभागातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. 

त्यासाठी नेते मंडळींची वाट न पाहता प्रभागातील ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते कार्यालयाचे उद्‌घाटन उरकण्यात आले. कुटुंबीयांसह मित्रमंडळी आणि नातेमंडळींना कामे वाटून देण्याची लगबग उमेदवारांच्या कचेऱ्यांमध्ये दिवसभर सुरू असल्याचे पाहावयास मिळत होते. सुटीचा दिवस आल्यामुळे सर्वच मंडळी मदतीला धावून आली होती. प्रभागातील मतदारांचे मोबाईलही आज दिवसभर उमेदवारांच्या मेसेजने फुल झाले. उपनगरातील उमेदवारांनी, तर एकत्र येऊन पदयात्रेच्या माध्यमातून प्रभाग ढवळून काढला. या सर्व धावपळीतच उमेदवारांचा आजचा दिवस संपला. 

प्रचार सुरू करण्याबाबत संभ्रम 
आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांना प्रचाराचा रोजचा खर्च रोज सादर करावा लागणार आहे. त्यामुळे प्रचार कधीपासून सुरू करावयाचा याबाबत अनेक उमेदवारांमध्ये संभ्रम होता. आज काही उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना भेटून या संदर्भात विचारणा केली, तेव्हा उमेदवारी अर्ज माघारी झाल्यानंतर प्रचार सुरू करावा, असे त्यांना सांगण्यात आल्यामुळे त्यांनी जाहीर प्रचार करणे टाळले. त्यामुळे काहींना आजचा दिवस तयारीतच घालवावा लागला. 

चारही उमेदवारांच्या बैठका 
अनेक राजकीय पक्षांच्या प्रभागातील चारही उमेदवारांनी रविवारी संयुक्त बैठका घेतल्या. प्रचाराचे नियोजन कसे करायचे, चौघांनी कोणकोणत्या भागात एकत्र जायचे, वैयक्तिक प्रचार कोठे करायचा, कुटुंबीयांकडे जबाबदारी काय द्यायची, निवडणुकीचा हिशेब कसा ठेवायचा आदींबाबत चर्चा करून त्यांनी नियोजन केले. तसेच प्रचारपत्रे तयार करण्यासाठी "फोटो शूट'ही अनेक ठिकाणी झाले. त्या छायाचित्रांच्या आधारे प्रचार साहित्य तयार करण्यासाठी लगबग सुरू होती. 

Web Title: Start campaign