चारा छावण्या सुरू करा, अन्यथा आंदोलन करणार; शेतकरी संघटनेचा इशारा

चारा छावण्या सुरू करा, अन्यथा आंदोलन करणार; शेतकरी संघटनेचा इशारा

पुणे : शेतकरी, कष्टकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू करा; अन्यथा शेतकरी, कष्टकरी, कामगार व अंगणवाडी सेविका एकाच दिवशी पाचही जिल्ह्यांत आंदोलन करतील, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी दिला आहे. 

मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्यासह विभागीय आयुक्‍तांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे राज्य सरकार आणि प्रशासनाकडून दुष्काळग्रस्त भागातील गंभीर प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांना पशुधन वाचविणे अवघड झाले आहे. इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा, बारामती, शिरूर आणि खेड तालुक्‍यांत पाणीटंचाईमुळे नागरिकांचे; तर चारा-पाण्याविना जनावरांचे हाल सुरू आहेत. परंतु, तहसीलदार, कृषी आणि पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कागदी घोडे नाचवत आहेत. प्रस्ताव सादर करूनही जिल्हा प्रशासनाकडून चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. 

नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. शेतकरी, कष्टकरी कुटुंबांतील प्रत्येकी दोन व्यक्तींना रोजगार हमी योजनेची कामे द्यावीत. रोजगार हमी योजनेतून 210 दिवसांचे वेतन पशुधन पालक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. सातारा, माण, खटाव, कोरेगाव, फलटण, सोलापूर, सांगोला, माळशिरस, सांगली, कडेगाव, जत आणि पन्हाळा येथील काही गावांमधील रेशन कार्डधारकांना रेशनवर धान्य
आणि रॉकेल मिळत नाही. त्यांना रेशनवर धान्य, रॉकेलपुरवठा सुरू करावा.

अंगणवाडी सेविकांचे मानधन प्रतिमाह दहा हजार रुपये आणि दिवाळी सानुग्रह अनुदान दहा हजार रुपये द्यावे. राज्य सरकारने दुधाला जाहीर केलेला 27 रुपये प्रतिलिटर हमीभाव न देणाऱ्या दूध संघांवर फौजदारी कारवाई करावी. अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या भरारी पथकांद्वारे शहरात दूधपुरवठा करणाऱ्या टॅंकरची तपासणी करण्यात यावी, अशा मागण्या या संघटनांनी केल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com