संगतीने रंगसंगतीचा स्टार्ट अप!

संगतीने रंगसंगतीचा स्टार्ट अप!

पुणे - तिने स्वतः फाइन आर्टमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. तर, मैत्रिणीने तिच्याकडून चित्रकलेचे धडे घेतले. सरावातून दोघी यात ‘मास्टर’ बनल्या. याच मास्टरकीतून या दोघींनी ही कला छंद म्हणून जोपासतानाच त्यातून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याचा निर्णय घेतला. अल्पावधीतच त्यांनी ‘सोलवॉल’ ही संस्था स्थापन करून त्यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या व्यवसायाचा ‘स्टार्ट अप’ केला.

अपर्णा निलांगे आणि प्रेमा राईलकर अशी या दोघींची नावे. अपर्णा यांनी फाइन आर्टमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी चित्रकलेचे क्‍लास सुरू केले. प्रेमा यांनीही त्यांच्याकडून चित्रकलेचे धडे घेतले. हळूहळू त्या चित्रे रेखाटू लागल्या. रंगसंगती जुळवत चित्रांना आकार देऊ लागल्या.  या कौशल्याचा व्यवसायाच्या पातळीवर उपयोग करून घ्यावा, असे या दोघींना वाटू लागले. हा केवळ व्यवसायच नसेल, तर त्यातून कलेचे संवर्धन व्हावे आणि तणावापासून मुक्ती मिळावी, हादेखील हेतू होता. त्यांनी स्थापन केलेल्या ‘सोलवॉल’ या संस्थेचे ब्रीदवाक्‍यच ‘टचिंग सोल विथ आर्ट’ हे आहे. या ‘स्टार्ट अप’च्या माध्यमातून विविध ठिकाणी सशुल्क कार्यशाळा आयोजित करून या दोघी आपल्या व्यवसायाला उभारी देताहेत; पण त्याच वेळी त्या कलेला प्रोत्साहन देत चित्रकार घडवत आहेत. कलेची आवड असणारे किंवा आवड असूनही ती जोपासता न येणारेही या कार्यशाळांमध्ये आवर्जून सहभागी होताहेत. वयाचं नसलेलं बंधन हे या कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे.     

कार्यशाळेतील सहभागींना कॅनव्हास, रंग यांसह चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण दिले जाते. ऑइल, ॲक्रेलिक, कॉफी, सिरॅमिक ॲक्रेलिक, चारकोल या माध्यमातून लॅंडस्केप, पोर्ट्रेट, नेचर, आफ्रिकन कला, वारली, लिंपन, तंजावर असे विविध चित्रकलेचे प्रकार शिकवले जातात. 

‘स्ट्रेस बस्टर’ची ओळख
‘फॅमिली गेट टुगेदर’, कॉर्पोरेट क्षेत्रातील ‘टीम बिल्डिंग’ अशा उपक्रमांत ‘सोलवॉल’च्या कार्यशाळेची मागणी होत असते. सणसुद, जयंत्या, वाढदिवस अशा विविध निमित्तानेही या कार्यशाळा आगाऊ नोंदणी करून आयोजित केल्या जात आहेत. चित्रकलेच्या आवडीतून सुरू झालेल्या या व्यवसायाला ‘स्ट्रेस बस्टर’ उपक्रम, अशी ओळख निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com