कचरा उचलण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

जुन्या-नव्या प्रकल्पांतून कचऱ्यावर प्रक्रिया सुरू राहणार

पुणे - फुरसुंगी आणि उरुळी देवाची ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतल्याने शहरातील कचरा उचलण्यास सोमवारपासून सुरवात झाली. डेपोत कचरा टाकण्यात येत असला, तरी जुन्या आणि नव्या प्रकल्पांच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रक्रिया सुरूच राहणार आहे. त्यामुळे साधारणतः हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया होईल; तर सहाशे टन कचरा डेपोत टाकण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

शहरात काही दिवसांपासून जमा झालेला कचरा उचलण्यासाठी सर्वच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत जादा कामगार नेमले आहेत. तसेच, कचरा वाहून नेण्यासाठी पुरेशा गाड्या उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे मंगळवारी दुपारपर्यंत सर्वच कचरा उचलला जाईल, असेही सांगण्यात आले. कचरा डेपोला आग लागल्यानंतर ग्रामस्थांनी तेथे कचरा टाकण्यास विरोध करत २३ दिवस आंदोलन केले होते. त्यामुळे दररोज जमा होणारा कचरा पूर्णपणे उचलला जात नव्हता. त्यामुळे अनेक भागांत ढीग साचले होते. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे डेपोत कचरा टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, ज्या भागात सर्वाधिक कचरा आहे अन्‌ त्याबाबत तक्रारी आहेत, तेथील कचरा उचलण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
छोटे-मोठे प्रकल्प कार्यान्वित करणार
आंदोलन संपल्याने कचरा उचलण्यास सुरवात झाली असली, तरी पुढील काही महिन्यांत छोटे आणि मोठे प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. येत्या डिसेंबरपर्यंत दीडशेपेक्षा अधिक टन क्षमतेचे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. शिवाय, काही जुन्या प्रकल्पांचीही क्षमता वाढविणार आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत एक हजार ६०० टन कचऱ्यावर प्रक्रिया होईल, असे महापालिकेचे सहायक आयुक्त संजय गावडे यांनी सांगितले.

आंदोलनाच्या काळातही सर्व भागांतील कचरा रोजच्या रोज उचलण्यात येत होता. मात्र, आता डेपोत कचरा टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात, काही प्रकल्पांसाठी कचरा पाठविण्यात येत आहे. आंदोलन सुरू असताना जे प्रकल्प सुरू केले, त्यासाठी कचरा नेला जात आहे.
- सुरेश जगताप,  प्रमुख,  घनकचरा व व्यवस्थापन विभाग

Web Title: Starting to pick up garbage