जुन्नर तालुक्यात भाताच्या राबभाजणीस सुरवात

दत्ता म्हसकर
सोमवार, 16 एप्रिल 2018

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील बळीराजाने भाताच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामास सुरवात केली आहे. आदिवासी भागातील खरिप हंगामातील भात हे मुख्य पीक असल्याने भात लागवडीचा एक भाग म्हणजे राबभाजणी. भात व नागलीचे बियाणे पेरणी करण्यापुर्वी शेतातील एका कोपऱ्यात जमिनीची भाजणी केली जाते. यासाठी पालापाचोळा, गोवऱ्या, शेणखत, झाडांच्या बारीक फांद्या पसरवून पेटवून दिले जाते. यामुळे जमिनीत असलेले गवताचे बियाणे जळून जाते शिवाय जमिन भूसभूशीत होते. अशा भाजणीच्या जागेवर भात व नागलीचे रोपे तयार केली जातात.

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील बळीराजाने भाताच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामास सुरवात केली आहे. आदिवासी भागातील खरिप हंगामातील भात हे मुख्य पीक असल्याने भात लागवडीचा एक भाग म्हणजे राबभाजणी. भात व नागलीचे बियाणे पेरणी करण्यापुर्वी शेतातील एका कोपऱ्यात जमिनीची भाजणी केली जाते. यासाठी पालापाचोळा, गोवऱ्या, शेणखत, झाडांच्या बारीक फांद्या पसरवून पेटवून दिले जाते. यामुळे जमिनीत असलेले गवताचे बियाणे जळून जाते शिवाय जमिन भूसभूशीत होते. अशा भाजणीच्या जागेवर भात व नागलीचे रोपे तयार केली जातात. आदिवासी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जूनमध्ये सुरू होत असला तरीही त्याची पूर्वतयारी मात्र एप्रिल पासूनच सुरू होत असते. जुन्नर तालुक्यात भाताचे 12 हजार हेक्टर क्षेत्र असून येथे पारंपरिक तसेच सुधारित पद्धतीने भाताचे उत्पादन घेतले जाते. तालुक्यातील ६५ आदिवासी गावातील शेतकरी भात लागवडीच्या पूर्व तयारीत गुंतला आहे. 

आदिवासी भागातील शेतकरी राब भाजणीसाठी झाडांच्या फांद्याचा वापर करत असला या कामासाठी तो झाडांची कत्तल करीत नाही तर उंच वाढलेल्या मोठ्या झाडांच्या निरुपयोगी फांद्या मुख्य झाडाला कोणत्याही प्रकारची इजा न पोचता छाटून घेतो. त्यामध्ये गवत, खत व इतर सुका पालापाचोळा टाकून जाळून टाकला जातो यात कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक किंवा हानिकारक ज्वलनशील पदार्थ नसतात. यामुळे पर्यावरण संरक्षण तर केले जातेच शिवाय जमिनीचा पोतही सुधारत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते. 

Web Title: starting of a rababhajani process for rice crop