नाबार्डच्या अहवालामध्ये राज्य सहकारी बॅंक सरस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंकेने (नाबार्ड) प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मन्स असेसमेंट अहवालानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने बहुतांश निकषांमध्ये राष्ट्रीय सरासरी आणि मानकांपेक्षा सरस कामगिरी केल्याची माहिती सहकारी बॅंकेकडून देण्यात आली.

पुणे - राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंकेने (नाबार्ड) प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मन्स असेसमेंट अहवालानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने बहुतांश निकषांमध्ये राष्ट्रीय सरासरी आणि मानकांपेक्षा सरस कामगिरी केल्याची माहिती सहकारी बॅंकेकडून देण्यात आली. 

नाबार्डकडून देशातील सर्व राज्य बॅंकांचा मार्च २०१९ अखेरचा परफॉर्मन्स अहवाल प्रकाशित केला आहे. यानुसार भांडवल पर्याप्ततेचे राष्ट्रीय मानांकन ९ टक्‍के; तर राष्ट्रीय सरासरी १३.५९ टक्‍के इतकी आहे. मात्र, राज्य बॅंकेने १५.६० टक्‍क्‍यांचा टप्पा गाठून स्थिरता मजबूत केली आहे. बॅंकेच्या प्रमुख भांडवलाचे एकूण मालमत्तेशी असलेले राष्ट्रीय मानक साडेचार टक्‍के आणि राष्ट्रीय सरासरी ६.४२ टक्‍के असताना राज्य बॅंकेने ९.६८ टक्‍क्‍यांपर्यंत मजल मारली आहे. तसेच, बॅंकिंग व्यवसायातील सर्वांत महत्त्वाचा ‘प्रोव्हिजन कव्हरेज रेशो’चे राष्ट्रीय मानक ७० टक्‍के आहे; तर राज्य सहकारी बॅंकेने ७९.०१ टक्‍क्‍याचा टप्पा गाठला आहे. गुंतवणुकीवरील उत्पन्न, ‘कॉस्ट ऑफ फंडस्‌’, व्यवस्थापन खर्चाच्या राष्ट्रीय मानकाच्या तुलनेत उत्तम कामगिरी केली आहे. बॅंकेच्या शाखांची संख्या ३८ वरून ४७ पर्यंत पोचली आहे. बॅंकेने ३१ मार्च २०१९ अखेर सुमारे ७५४ कोटी रुपयांचा उच्चांकी व्यवसाय केल्याचे बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State co-operative bank best in NABARDs report