प्रमुख शहरांमधील पोलिस आयुक्तांच्या बदल्यांबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

poi.jpg
poi.jpg

पुणे ः पोलिस दलातील अतिवरिष्ठ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचा घोळ न मिटल्यामुळे अखेर राज्य सरकारने 5 सप्टेंबरपर्यंत बदल्या न करण्याचे ठरविले आहे. त्यानंतर बदल्यांचा निर्णय होणार असल्याचे एका आदेशानुसार शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले. राजकीय सहमती न झाल्यामुळे या बदल्या रखडल्या, असे समजते.

प्रशासकीय बदल्या सर्वसाधारणपणे एप्रिल- मे महिन्यात होतात. कोरोनाच्या संकटामुळे यंदा 25 मार्च ते जुलैअखेरपर्यंत राज्याच्या विविध भागात पोलिसांवर ताण होता. त्यामुळे बदल्या पुढे ढकल्याण्यात आल्या होत्या. मात्र, 7 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने 15 ऑगस्टपर्यंत बदल्या करण्यात येतील, असे जाहीर केले होते. त्यानुसार पुणे, नागपूर, नवी मुंबई, नाशिक, मीरा भाईंदर आदी विविध जिल्ह्यांचे पोलिस आयुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांची नावे आणि त्यांचे पोस्टिंग्ज यांची नावेही फायनल झाली होती. मात्र, काही नावांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये सहमती झाली नाही. तर, काही नावांबाबत पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांचे आक्षेप होते. त्यामुळे त्यांनी बदल्यांच्या आदेशावर स्वाक्षरी केली नाही, अशी चर्चा आहे. परिणामी बदल्यांचा घोळ मिटला नव्हता. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने बदल्यांना 5 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

राज्यात 22 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यानंतर 1 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे. त्यामुळे राज्यातील गणेशोत्सवाची धामधुम संपल्यावरच बदल्यांना मुहूर्त मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील अनेक महापालिकांत दीड वर्षांत निवडणूक होणार आहे. तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही आहेत. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्यांना महत्त्व आहे.

त्यातच गृहखाते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असले तरी, अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. तसेच कॉंग्रेसचेही यामध्ये काही म्हणणे आहे. त्यामुळे बदल्यांबाबत राजकीय सहमती झालेली नाही, असे समजते. तसेच बदल्या करताना, संबंधित अधिकाऱ्यांनी या पूर्वी केलेल्या पोस्टिंग्ज, त्यांची सेवाज्येष्ठता, तसेच त्यांची क्षमता याचा आधार घेऊनच बदल्या कराव्यात, असा पोलिस महासंचालक कार्यालयाचा आग्रह आहे. परंतु, काही बदल्यांत त्यांचे उल्लंघन झाल्यामुळे महासंचालक नाराज झाले आहेत, असे समजते.

दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर बदल्यांना 20 दिवस मुदतवाढ देऊन आता पुन्हा सहमतीचे प्रयत्न होतील, अशी चिन्हे आहेत. दरम्यान, फायनल झालेल्या नावांमध्ये पुण्याच्या आयुक्तपदी अमिताभ गुप्ता, नागपूरच्या पोलिस आयुक्तपदी राजेंद्रसिंग, पिंपरी चिंचवडच्या आयुक्तपदी कृष्ण प्रकाश, नाशिकच्या आयुक्तपदी कैसर खलिद, मीरा भाईंदरच्या आयुक्तपदी सदानंद दाते, मुंबई रेल्वेच्या आयुक्तपदी भूषणकुमार उपाध्याय आदी नियुक्‍त्या फायनल झाल्या आहेत, अशी पोलिस वर्तुळात चर्चा आहे. परंतु, फायनल झालेल्या नावांमध्ये पुन्हा काही बदल होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पोलिसांच्या बदल्यांबाबत पुन्हा एकदा औत्सुक्‍य निर्माण झाले आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com