तळजाईच्या झोनबदलाला राज्य सरकारचा नकार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

 तळजाई टेकडीवरील ‘डोंगरमाथा-डोंगरउतार’चा झोन बदलून ऑक्‍सिजन पार्कचे आरक्षण टाकण्याचा डाव राज्य सरकाराने उधळून लावला आहे.

पुणे - तळजाई टेकडीवरील ‘डोंगरमाथा-डोंगरउतार’चा झोन बदलून ऑक्‍सिजन पार्कचे आरक्षण टाकण्याचा डाव राज्य सरकाराने उधळून लावला आहे. शहरातील टेकड्यांबाबतचा निर्णय राज्य सरकारने स्थगित ठेवला असल्यामुळे टेकड्यांचा झोनबदल करणे शक्‍य होणार नाही, असे राज्याच्या नगर विकास खात्याने महापालिकेला कळविले आहे.

तळजाई टेकडीवर १९८७ च्या विकास आराखड्यात ‘डोंगरमाथा-डोंगरउतार’चा झोन दर्शविण्यात आला होता. जुन्या हद्दीचा विकास आराखडा नव्याने तयार करताना प्रारूप आराखड्यात महापालिकेकडून झोन बदलून ‘ऑक्‍सिजन पार्क’ हे आरक्षण दर्शविण्यात आले होते. दरम्यान, राज्य सरकारने महापालिकेच्या ताब्यातील हा प्रारूप आराखडा काढून घेतला. त्यास जानेवारी २०१७ मध्ये मान्यता देताना तळजाई टेकडीवर ऑक्‍सिजन पार्कचे आरक्षण काढून पुन्हा ‘डोंगरमाथा’ हा झोन कायम ठेवला होता. असे असताना हा झोन बदलून त्या ठिकाणी पार्कचे आरक्षण दर्शविण्यात यावे, अशी मागणी वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक यांनी पत्राद्वारे राज्य सरकारकडे केली होती. झोनबदल झाल्यास आणि त्या ठिकाणी पार्कचे आरक्षण दर्शविल्यास त्याचा मोबदला टीडीआर स्वरूपात देणे शक्‍य व्हावे, या हेतूने प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्या वेळी करण्यात आला होता. त्यामुळे राज्य सरकार यामध्ये काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु, नगर विकास विभागाने तळजाई टेकडीवरील झोन बदलून पार्कचे आरक्षण दर्शविण्यास विरोध केल्याने तो प्रयत्न असफल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Government's rejection taljai hill zone change