राज्यमंत्री शिवतारेंनी वाचविले समाजाचे 23.76 कोटी रुपये

श्रीकृष्ण नेवसे
शुक्रवार, 11 मे 2018

सासवड (पुणे) : जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे हे त्यांच्या शिवतारे मित्र मंडळांच्या वतीने होणाऱया सोहळ्याद्वारे समाजाची आर्थिक बचत करीत आहेत. गेल्या 10 वर्षात 792 वधू - वरांचे त्यांनी संसार उभे करण्याचे काम करताना मोठा हातभार लावला. एका कुटुंबाचा किमान खर्च प्रत्येकी दिड लाख धरला तरी 792 वधू - वरांच्या कुटुंबियांची सुमारे 23.76 कोटी रुपयांची म्हणजेच समाजाची याव्दारे बचत केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. जो काही खर्च होतो, तो सारा भार शिवतारेच उचलतात, असे पुरंदर तालुका पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के यांनी सांगितले. निमित्त आहे, यंदाच्या उद्या शनिवारी (ता.

सासवड (पुणे) : जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे हे त्यांच्या शिवतारे मित्र मंडळांच्या वतीने होणाऱया सोहळ्याद्वारे समाजाची आर्थिक बचत करीत आहेत. गेल्या 10 वर्षात 792 वधू - वरांचे त्यांनी संसार उभे करण्याचे काम करताना मोठा हातभार लावला. एका कुटुंबाचा किमान खर्च प्रत्येकी दिड लाख धरला तरी 792 वधू - वरांच्या कुटुंबियांची सुमारे 23.76 कोटी रुपयांची म्हणजेच समाजाची याव्दारे बचत केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. जो काही खर्च होतो, तो सारा भार शिवतारेच उचलतात, असे पुरंदर तालुका पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के यांनी सांगितले. निमित्त आहे, यंदाच्या उद्या शनिवारी (ता. 12) सायंकाळी 6 वाजता राज्यमंत्री विजय शिवतारे मित्रमंडळाच्या वतीने होणाऱया 11 व्या वर्षीच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे!

उद्या (ता. 12) सायंकाळी पुरंदर - हवेली तालुक्यातील गरजुंसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. कै. बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत हे 38 जोडप्यांचे विवाह होत असून संसारोपयोगी वस्तुंसह वधूस सोन्याचे मनी मंगळसूत्रही दिले जाणार आहे. यंदाचे हे सामुदायिक विवाह सोहळ्याचे 11 वे वर्ष आहे. पुढील वर्षी तपपूर्ती होत आहे. सर्व जातीधर्माच्या विवाहोच्छुक, गरजूंचे विवाह येथे मोठ्या थाटामाटाने करण्यात येतील., असे सोहळ्याचे प्रमुख व राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी दिलीप यादव, रावसाहेब पवार यांनी सांगितले. मार्च 2008 मध्ये श्री. शिवतारेंनी स्वतःचा मुलगा विनयच्या लग्नासह 142 जोडप्यांचे संसार उभे करत शाही सामुदायिक विवाह सोहळ्याची मुहूर्तमेढ पुरंदरमध्ये रोवली होती. स्थानिक शेतकऱ्यांनी मुलामुलींच्या लग्नासाठी कर्ज काढू नये आणि बँका, पतसंस्था किंवा सावकारांच्या कठोर वसुलीस त्यांना तोंड द्यावे लागू नये, म्हणून शिवातारेंनी नैतिक जबाबदारी स्विकारत विवाह सोहळ्यास सुरुवात केली होती. ही सोहळ्याची परंपरा अखंड सुरु असून तपपूर्तीकडे सोहळा जात आहे.  

यंदा सासवड (ता. पुरंदर) येथील क्रमांक दोनच्या पालखीतळावर होणाऱया या 38 जोडप्यांच्या विवाह सोहळ्यात सहभागी नवदांपत्यास मणी मंगळसूत्र, हळदीची साडी, लग्नाचा शालू, नवरदेवाचा सफारी, संसारोपयोगी भांडी, मनगटी घड्याळ, बूट व चप्पल देण्यात येतील. कन्यादान योजनेंतर्गतचा व शासकीय लाभही देण्यात येईल. याचबरोबर सर्व वऱ्हाडी मंडळींना सुग्रास जेवणाची मेजवानी दिली जाईल. जेवण, मंडप व सोहळ्याचा सारा खर्च मित्र मंडळ करीत आहे. संपूर्ण पुरंदर - हवेली तालुक्यातील जनतेला या विवाह सोहळ्याचे जाहीर निमंत्रण दिल्याचेही यानिमित्ताने तालुका पंचायत समिती सभापती अतुल म्हस्के यांनी सांगितले. निमंत्रण न पोचलेल्या लोकांनीही या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे व शुभेच्छा द्याव्यात, असेही आवाहन केले. यंदाही वधू - वरांस शुभाशीर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित केले आहे. 

Web Title: state minister shivtare saves 23.76 crore of community