पुण्यात चक्क मांजरींवर होणार नसबंदी शस्त्रक्रिया!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

- भटक्या कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया झाल्याचे ऐकले असेल पण आता मांजरींवरही होणार शस्त्रक्रिया.

पुणे : नसबंदी करूनही शहरातील भटक्‍या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे अनुभव सर्वच पुणेकरांचा आहे. असे असतानाच महापालिका आता भटक्‍या माजरींचीही नसबंदी करणार आहे. त्यासाठी दर महिन्याला दोन लाख याप्रमाणे पाच वर्षांसाठी तब्बल एक कोटी 20 लाख रुपये खर्च येणार आहे. त्या खर्चाच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली.

शहरातील भटक्‍या कुत्र्यांच्या संख्या नियंत्रित करण्यासाठी महापालिकेकडून त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण केले जाते. शस्त्रक्रियेनंतर कुत्र्यांना पकडलेल्या ठिकाणी पुन्हा सोडले जाते. त्याच धर्तीवर आता शहरातील भटक्‍या मांजरींनाही पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया व त्यांचे लसीकरण केले जाणार आहे. यासंबंधीचे पत्र "ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया'ने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवले होते.

भटक्‍या मांजरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी लसीकरण करणे व त्यांची संख्या मर्यादित राहण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही कार्यवाही भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाने केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचे आदेश दिले आहेत. 

त्यानुसार महापालिका हद्दीतील भटक्‍या व मोकाट कुत्र्यांची व मांजरींची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या कामासाठी साठ महिने कालावधीसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे. यासाठी एक कोटी 20 लाखाचे वर्गीकरण करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी दिली. 

किती मांजरींची होणार शस्त्रक्रिया? 

शहरात 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यान 10 हजार 595 कुत्र्यांवर नसबंदी करण्यात आली आहे. तर, 10 हजार 436 डुकरे पकण्यात आली आहेत. आता कुत्रे आणि डुकरे यांच्याबरोबरच आता भटक्‍या मांजरी शोधणे, त्यांना पकडणे आणि त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्याचे कौशल्य महापालिका प्रशासनाला दाखवावे लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sterilization Operation on Cat in Pune