
Pune Crime News : पोलिसांच्या हाती लागला मोठा शस्त्रसाठा
पुणे : शहरात बेकायदा पिस्तूल विकणाऱ्या गुन्हेगारांविरुद्धच्या कारवाईत गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी दोन डिलरसह सात सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून १७ गावठी पिस्तूल आणि १३ जिवंत काडतूस असा शस्त्रसाठा जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
हनुमंत अशोक गोल्हार (वय २४, रा.जवळवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), प्रदीप विष्णू गायकवाड (वय २५, रा ढाकणवाडी ता. पाथर्डी, मूळ रा. चहाटा फाटा, जि. बीड), अरविंद श्रीराम पोटफोडे (वय ३८, रा. अमरापुरता शेवगाव जि. अहमदनगर), शुभम विश्वनाथ गरजे (वय २५, रा. वडुले, ता. नेवासा जि. अहमदनगर),
ऋषिकेश सुधाकर वाघ (वय २५, रा. सोनई, ता. नेवासा), अमोल भाऊसाहेब शिंदे (वय २५, रा. खडले परमानंद ता. नेवासा), साहिल तुळशीराम चांदेरे ऊर्फ आतंक (वय २१, रा. सूसगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यात गोल्हार आणि गायकवाड हे डीलर आहेत.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरात बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने २५ फेब्रुवारीला पिस्तूल विक्री करणाऱ्या दोन डिलर्सना वाघोली येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे मिळाली होती.
तपासादरम्यान, आरोपी हनुमंत गोल्हार हा नवी मुंबई येथील दोन कोटी ८० लाख रुपयांच्या एका दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे समजले. त्यानंतर आरोपींकडून पिस्तूल विकत घेणारे अरविंद पोटफोडे, शुभम गरजे, ऋषिकेश वाघ, अमोल शिंदे यांना पोलिसांनी अटक केली.

तसेच, युनिट एकच्या पथकाने अन्य एका कारवाईत सिंचन भवनसमोरून साहिल चांदेरे याला ताब्यात घेतले. या सर्व सात आरोपींकडून १७ गावठी पिस्तूल, १३ जिवंत काडतुसे, एक कार, मोबाईल असा सुमारे २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार, नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने ही कारवाई केली.