लॅाकडाउनमुळे दुप्पट पैसे मिळतील म्हणून केला ५० बॅाक्सचा स्टॅाक, पण...  

DAUND
DAUND

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा कडकडीत लॅाकडाउन लागू होईल, या आशेने बेटवाडी (ता. दौंड) येथील एका तरुणाने तब्बल सव्वालाख रुपये मूल्य असलेल्या दारूचा साठा केला होता. परंतु, पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करून हा स्टॅाक जप्त केला.  

पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशाने ११ जुलै रोजी दौंड- पाटस रस्त्यालगत बेटवाडी येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी संदीप भाऊसाहेब भुजबळ (वय ३३, रा. बेटवाडी) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला बेटवाडी येथे एका शेतात दारूचा साठा असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी छापा टाकून कारवाई केली.

या कारवाईत संदीप भुजबळ याच्या शेतातील १ लाख २४ हजार ८०० रूपये मूल्य असलेले दारूचे पन्नास बॅाक्स जप्त करण्यात आले. पुन्हा कडकडीत लॅाकडाउन लागू होईल, या आशेने संदीप भुजबळ याने बेकायदेशीरपणे दुप्पट दराने विक्री करण्याकरिता हा दारूचा साठा केला होता, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. कोणताही परवाना नसताना संदीप याला तब्बल ५० बॅाक्स दारू पुरविणाऱ्या वितरकाचा पोलिस शोध घेत आहेत. 

गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय गुंड यांच्यासह महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, रौफ इनामदार व अक्षय जावळे यांनी या कारवाईत भाग घेतला. पोलिस नाईक गुरूनाथ गायकवाड यांनी या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 
 
Edited by : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com