दगड फोडणारा दत्तात्रेय बनला फौजदार

संतोष शेंडकर
शनिवार, 23 जून 2018

संतोष शेंडकर
सोमेश्वरनग : हॅाटेलात कपबशा विसळत असताना आणि दगडखाणीत दगड फोडत असतानाही त्याने सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. कन्नडवस्तीसारख्या दुर्लक्षित आणि वंचित वस्तीत रहात होता आणि दिव्यावर अभ्यास करत होता तरीही खचला नाही. हाताशी पैसा नसल्याने त्याने सरकारी कोट्यातील जागा पटकावत आधी अभियांत्रिकीची पदवी मिळविली आणि आता तर तो फौजदार बनला आहे.

संतोष शेंडकर
सोमेश्वरनग : हॅाटेलात कपबशा विसळत असताना आणि दगडखाणीत दगड फोडत असतानाही त्याने सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. कन्नडवस्तीसारख्या दुर्लक्षित आणि वंचित वस्तीत रहात होता आणि दिव्यावर अभ्यास करत होता तरीही खचला नाही. हाताशी पैसा नसल्याने त्याने सरकारी कोट्यातील जागा पटकावत आधी अभियांत्रिकीची पदवी मिळविली आणि आता तर तो फौजदार बनला आहे.

वाघळवाडी ग्रामपंचायतअंतर्गत कन्नडवस्ती (ता. बारामती) या तीस-चाळीस घराच्या छोट्या वस्तीतील दत्तात्रेय मुकेश अलगुर याच्या जिद्दीची ही गोष्ट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याने कुठल्याही ठोस मार्गदर्शनाशिवाय पहिल्याच प्रयत्नात 340 पैकी 220 गुण मिळवत पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली असून 'अनुसूचित जाती' प्रवर्गातून राज्यात सव्वीसावा आला आहे. त्याच्या या यशाने कन्नडवस्तीत जणू जल्लोष होत आहे.

मुकेश व विजाबाई अलगूर या दांपत्याला चार मुले. स्वतः निरक्षर असले तरी मुलांना शिकविण्याची जिद्द होती. दोघेही निर्व्यसनी आणि कष्टाळू होते. मुकेश हे सोमेश्वरचे संचालक नामदेव शिंगटे यांच्या दगडखाणीवर काम करत. विजाबाई दररोज शेतात मजूरीस जात. तरी चौघांना शिकवू शकत नसल्याने थोरल्या अनुसयाचे सातवीनंतर लग्न झाले. सचिन व्दितीय वर्ष कला शाखेपर्यंत शिकला पण रोजगार शोधत गवंडीकाम करू लागला. लक्ष्मी आणि दत्तात्रेय मात्र वाणेवाडीतील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत चमकत राहिले. शिक्षणाचा, आरोग्याचा खर्च पेलत नसल्याने लक्ष्मी सुट्ट्यांमध्ये खुरपायला जात होती आणि दर शनिवार-रविवार दत्तात्रेय वडीलांसोबत दगड फोडण्यासाठी जात होता.

उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत सोमेश्वर कारखान्यावरील 'बुनगे हॅाटेल'मध्ये काम करत होता. सातवीपासून दहावीपर्यंत त्याने ही कामे केली. दहावीपर्यंत घरात वीजही नव्हती तरी त्याला 85.53 टक्के गुण मिळाले. चांगल्या गुणांमुळे पुण्यात शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातून त्याने मेकॅनिकल शाखेत डिप्लोमा केला. 76 टक्के गुण मिळाल्याने सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सरकारी कोट्यातून प्रवेश मिळाला. राहणे, खाणे व शालेय खर्चासाठी आईवडिल वर्षभर एकही सुट्टी न घेता आणि दहा रूपयेही वायफट खर्च न करता राबत होते.

 लक्ष्मी मुंबई पोलिस सेवेत भरती झाली आणि तिने घराला आधार दिला. दत्तात्रेयनेही मग 71 टक्के गुण मिळवून त्यांच्या कष्टाचे चीज केले. इतके गुण मिळूनही आणि अनेकांकडे खेटे घालूनही नोकरी मिळाली नाही. त्याने पुणे विद्यापीठाची स्पर्धा परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा दिली. पहिल्याच प्रय़त्नात यश मिळाल्यावर विद्यापीठात मित्राकडे पॅरासाईट म्हणून राहिला आणि एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात पीएसआयच्या परीक्षेत यश प्राप्त केले. प्रा. पोपट माने यांनी त्याला मार्गदर्शन केले. प्रशांत कोळपे याने मैदानात तर पंकज लोखंडे याने अभ्यासात मदत केली. 

दत्तात्रेय म्हणाला, आईवडिल दहा रूपयेही विचारपूर्वक खर्चून आम्हाला शिकवायचे. डेंग्यू झाला तरी वडीलांनी सुट्टी घेतली नव्हती. ते डोळ्यापुढे होते आणि वस्तीचही नाव व्हावं हा विचार होता. आता मागास घटकासाठी शक्य तितके काम करणार. तर विजाबाई म्हणाल्या, अभ्यासाला चौघाला चार दिवं होतं. चप्पलसुदा नव्हती. सुट्ट्यात पोरं कामं करायची. आता पोरगं सायेब झालं. जीव मोठा झाला.

Web Title: The stone-breaker became police officer