पुणे : ताडीवाला रोड झोपडपट्टीतील घरांवर टोळक्याची दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

पुणे : पुणे स्टेशनजवळील ताडीवाला रोड झोपडपट्टीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री गुंडांनी नागरीकांच्या घरांवर अक्षरशः पावसाप्रमाणे दगडफेक करत, 8-10 रिक्षांची तोडफोड करुन दहशत निर्माण केली. त्यामध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. दरम्यान, झोपडपट्ट्यांमध्ये गुंडांकडून सातत्याने असे प्रकार केले जात असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर पोलिसांकडून मात्र झोपडपट्टीदादा, सराईत गुंडांवर वचक निर्माण करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची सद्यस्थिती आहे. 

लॉरेन्स उर्फ लागर राजु पिल्ले (वय 32), रोहन मल्लेश तुपधर (वय 32), शशांक उर्फ ऋषभ संतोष बेंगळे (वय 20. तिघेही रा.ताडीवाला रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी परशुराम धनगर (वय 28, रा. ताडीवाला रोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी धनगर हे शुक्रवारी रात्री जेवण करुन ताडीवाला रोड परिसरात पायी फिरत होते. त्यावेळी समोरील गल्लीतून आरोपी व त्यांचे साथीदार काचेच्या बाटल्या, दगड घरांवर, रस्त्यांवरील रिक्षांवर फेकत होते. दरवाजांवर तलवारी, अन्य हत्यारांचे वार करत होते. त्यांच्या भितीपोटी नागरीक घाबरून घरांची दारे-खिडक्‍या लावत होते. गुंडांच्या टोळक्‍यातील लॉरेन्स पिल्ले याने फिर्यादींना ओळखून साथीदारांना फिर्यादींना जीवे मारण्यास सांगितले. त्यानंतर लॉरेन्सने फिर्यादींच्या डोक्‍यात पालघनाने वार केला, तर इतरांनी त्यांना दगड, लाकडी दांडक्‍याने मारत शस्त्रांनी वार केले. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. 

"रात्रीच्यावेळी पाणी सुटत असल्याने झोपडपट्टीतील नागरीक पाणी भरण्यासाठी जागे होते. त्याचवेळी हातात तलवारी घेऊन गुंडांनी वस्तीमध्ये धुडगुस घातला. गोरगरीबांच्या रिक्षा फोडल्या. सराईत गुंड तरुण व अल्पवयीन मुलांना हाताशी धरुन दहशत पसरवित आहेत. पोलिसही त्यांच्यावर कायमस्वरुपी कारवाई करत नसल्याने नागरीक घाबरले आहेत.'' - श्‍याम गायकवाड, रहिवासी 

पोलिसांचे झोपडपट्टी दादा, गुंडांकडे दुर्लक्षच पोलिसांचे -  
ताडीवाला रोड झोपडपट्टीसह शहराच्या वेगवेगळ्या भागातील झोपडपट्ट्यांमधील गुंडांकडून सर्वसामान्य नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो. गुंडांच्या दहशतीमुळे नागरीकांच्या मनात भिती आहे. काही मोजक्‍या गुंडांवर पोलिसांकडून तोंडदेखली तडीपारीची कारवाई केली जाते. पोलिस ठाणे, चौक्‍यांमधील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना संबंधीत गुंडांकडून नागरीकांना त्रास दिला जात असल्याची माहिती असूनही पोलिस प्रशासनाकडून त्यांच्यावर ठोस कारवाई केली जात नसल्याने झोपडपट्टीतील रहीवासी अक्षरशः हवालदील झाले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stone pelting on houses at Tadiwala road slum are in Pune