#MarathaKrantiMorcha दौंड शहरात दगडफेक

#MarathaKrantiMorcha  दौंड शहरात दगडफेक

दौंड - दौंड शहरात आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा समाजातील युवकांनी रास्ता रोको आंदोलन करण्यासह संपूर्ण व्यापारपेठ बंद पाडली. शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या असून, एक दुकानदार जखमी झाला आहे. नगरपालिका अग्निशमन बंब व एका एसटी बसचे नुकसान करण्यात आले. 

दौंड येथे सकाळी अकरा वाजता रेल्वे उड्डाण पूल येथे पाटस-दौंड-बारामती रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व युती सरकार विरोधात या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे दौंड-बारामती, दौंड-नगर व दौंड-पाटस रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. दौंड शहरासह सोनवडी, गार, गिरीम, बेटवाडी येथील मोर्चातील युवकांनी घोषणाबाजी करीत व्यापारपेठ बंद पाडली. बंदविषयी पूर्वसूचना नसल्याने बहुतांश दुकाने उघडी होती. मात्र, काही युवकांनी या उघड्या दुकानांवर दगडफेक केली. दुचाकी वाहनांवर हातात भगवे झेंडे व दगडे घेऊन फिरणाऱ्या जमावामुळे बाजारपेठेत आलेले सर्वसामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी व व्यापारी यांची धांदल उडाली. दौंड-नगर महामार्गावरील नानवीज फाटा येथे आंदोलकांनी टायर पेटविल्याने ते विझविण्यासाठी गेलेला दौंड नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या काचा फोडण्यात आल्या. जमावाने घोषणाबाजी करीत मुख्य बाजारपेठेसह दौंड-गोपाळवाडी रस्त्यावरील दुकाने बंद पाडली. त्याचबरोबर दौंड-श्रीगोंदे या एसटी बसच्या काचा फोडण्यात आल्या. ऋतुविहार अपार्टमेंटमधील मोना मिनी मार्केटचे खैरे नामक दुकानदाराने दुकान बंद न केल्याने तोंडावर दगड मारून त्यांना जमावाने जखमी केले. सोनवडी (ता. दौंड) येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या काचा फोडण्यात आल्या. मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सांगता करण्यात आली. दगडफेकीच्या घटनानंतर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तोडफोड, दगडफेक, सरकारी वाहनांचे नुकसान व वैयक्तिकरित्या इजा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

रुग्णवाहिकेसाठी केला मोकळा रस्ता  
रेल्वे उड्डाण पूल येथे एक रुग्णवाहिका आली असता, त्यास आंदोलकांनी रस्त्यावर आडवी लावलेली वाहने काढून काही क्षणांत रस्ता मोकळा करून दिला. काही वेळानंतर आंदोलनस्थळापासून जाणाऱ्या सर्वांना रोखण्यात आले; परंतु तातडीने जाणे आवश्‍यक असणाऱ्यांनाही आंदोलक सोडत नव्हते. मात्र, समाजातील वरिष्ठांनी तंबी दिल्यानंतर त्यांच्यासाठी रस्ता खुला करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com