'मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलवसुलीला स्थगिती द्या'

Stop collecting toll on Pune Mumbai Express Highway
Stop collecting toll on Pune Mumbai Express Highway

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुलीचे कंत्राट 2004 मध्ये 14 वर्षांसाठी कंत्राटदाराला दिले गेले. ज्याची मुदत 9 ऑगस्ट 2019 ला संपली आणि त्यानंतर 10 ऑगस्ट 2019 पासून तात्पुरते कंत्राट करून नवीन कंत्राटदाराला हे टोलवसुली कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील टोलवसुलीला स्थगिती द्या, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.

वेलणकर यांनी म्हटले आहे, की ऑक्टोबर महिन्यात या रस्त्यावरून 19 लाख वाहने धावली आणि त्यांचे कडून 67 कोटी रुपये टोल जमा झाल्याचे दाखवले आहे आणि ही टोलेबल वाहन संख्या असल्याचे म्हटले आहे. नव्या अहवालात नवीन कंत्राटदाराने नोव्हेंबर 2019 ची आकडेवारी दिली असून ज्यामध्ये नोव्हेंबर 2019 या महिन्यात या रस्त्यावरून 19.34 लाख वाहने धावल्याचे दाखवले असून त्याच्याकडून 71 कोटी रुपये टोल जमा झाल्याचे दाखवले आहे आणि ही टोलेबल वाहनसंख्या असल्याचे म्हटले आहे. यामध्ये सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन कंत्राटदारांनी दाखवलेल्या या रस्त्यावरून धावलेल्या वाहनांच्या संख्येत तिपटीचा फरक असूनही कमी वाहनसंख्या दाखवणाऱ्या कंत्राटदाराने 15 % जास्त टोल जमा झाल्याचे दाखवले आहे. नवीन कंत्राटदाराच्या वाहनसंख्या आणि जमा टोल रक्कम यामध्येही तीन महिन्यात खूपच तफावत आहे. 

एकूणच प्रत्येक महिन्यात एकूण धावलेली वाहने, टोलेबल वाहन संख्या, जमा टोल या सगळ्या आकड्यांचा मेळ जुळतच नाही. मुळात टोलेबल आणि नॉन टोलेबल वाहने या संकल्पनेचा अर्थ नक्की काय याचा हि उलगडा होत नाही. या रस्त्यावरील टोलमधील झोलची चौकशी करण्याची मागणी आम्ही गेली चार वर्षे याआधीच्या मुख्यमंत्र्यांकडे करत आलो आहोत. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. आता आपल्याकडे राज्याचा कारभार आला आहे त्यामुळे आपण या विषयात लक्ष घालून या आकडेवारीच्या गौडबंगालाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत .  तोपर्यंत या रस्त्यावरील टोलवसुलीला स्थगिती द्यावी अशी आग्रहाची मागणी आहे, वेलणकर यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com