यवतला वादळाचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

यवत - यवत गावाला व परिसराला काल सायंकाळी सुरू झालेल्या वादळाचा चांगलाच तडाखा बसला. उन्मळलेली झाडे, छतांचे उडालेले पत्रे, जमिनदोस्त झालेली पिके आणि जखमी जनावरे अशी स्थिती अनेक ठिकाणी झाली. काल सात वाजण्याच्या सुमारास वादळामुळे कोलमडलेली वीजयंत्रणा आज दुपारी काही अंशी पूर्ववत झाली.

यवत - यवत गावाला व परिसराला काल सायंकाळी सुरू झालेल्या वादळाचा चांगलाच तडाखा बसला. उन्मळलेली झाडे, छतांचे उडालेले पत्रे, जमिनदोस्त झालेली पिके आणि जखमी जनावरे अशी स्थिती अनेक ठिकाणी झाली. काल सात वाजण्याच्या सुमारास वादळामुळे कोलमडलेली वीजयंत्रणा आज दुपारी काही अंशी पूर्ववत झाली.

काल सायंकाळी वादळाला सुरवात झाली, तशी वीज यंत्रणा कोलमडण्यास सुरवात झाली. त्यातच येथील वीज उपकेंद्रावर वीज पडल्याने आणि विजेचे खांब अनेक ठिकाणी उन्मळून पडल्याने यवतकरांना रात्र अंधारात काढावी लागली. रात्री दहाच्या सुमारास वादळाचा जोर वाढत गेला. विजांचा कडकडाट, गारा मिश्रित पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने सुमारे तासभर थैमान घातले. या अस्मानी संकटाचा तडाखा अनेक ठिकाणी बसला. 

भुलेश्वर फाटा येथे दोरगे बंधूंनी नव्यानेच उभारलेल्या दुकानांवर भला मोठा रेन ट्री कोसळला. सुदैवाने कोणास इजा झाली नाही, तेथून जवळच असलेल्या नंदू दोरगे यांच्या शेतघराचे छप्पर पूर्णपणे उडून बाजूला पडले. गणेश लाटकर यांच्या पोल्ट्रीचे छत उडाल्याने त्यांच्या शेकडो कोंबड्या मृत झाल्या. दोरगेवाडी व इतर ठिकाणी मिळून विजेचे पंधरा खांब उन्मळून पडले. सचिन शितोळे यांचा बेण्यासाठी राखलेला सुमारे दीड एकर उस भुईसपाट झाला. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कडवळ (जनावरांचा चारा) भुईसपाट झाला. भरतगाव (ता. दौंड) येथील हाकेवाडीचे मेंढपाळ शेतकरी सावळाराम हाके यांच्या अनेक मेंढ्या या वादळात जखमी झाल्या. डाकबंगला परिसरातील मेहबूव शेख व सतीश दोरगे यांच्या गॅरेजची छते वादळाने उडाल्याने मोठे नुकसान झाले.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे अथक प्रयत्न
काल सायंकाळी वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला. तो पूर्ववत करण्याचा महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता. अंधारामुळे काम करण्यास मर्यादा येत होत्या. मात्र, थोड्याशा विश्रांतीनंतर कनिष्ठ अभियंता प्रकाश काकडे यांच्या नेतृत्वाखाली व सहायक अभियंता संजयकुमार मालपे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे कर्मचारी पहाटे पुन्हा कामाला लागले. साडेतीनच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत झाला. 

Web Title: storm rain loss

टॅग्स