Video : जलरंगाचा मधुर, किणकिणता, मोहक नाद

नीला शर्मा
Saturday, 9 May 2020

जल या तत्त्वाचा उपयोग करून घेऊन जलतरंग हे पारंपरिक वाद्य वाजवलं जातं. लहानमोठ्यांना त्यातून निघणाऱ्या मोहक नादाची भुरळ पडते. जलतरंगवादक मिलिंद तुळाणकर हे या वाद्यावर शास्त्रीय संगीताबरोबरच सुगम संगीतही लीलया वाजवतात. त्यांच्याकडे हे वाद्य शिकणाऱ्या बच्चे कंपनीला ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला,’ ‘हम होंगे कामयाब’ यांसारख्या सुरावटी शिकायचा मोह पडतो.

जल या तत्त्वाचा उपयोग करून घेऊन जलतरंग हे पारंपरिक वाद्य वाजवलं जातं. लहानमोठ्यांना त्यातून निघणाऱ्या मोहक नादाची भुरळ पडते. जलतरंगवादक मिलिंद तुळाणकर हे या वाद्यावर शास्त्रीय संगीताबरोबरच सुगम संगीतही लीलया वाजवतात. त्यांच्याकडे हे वाद्य शिकणाऱ्या बच्चे कंपनीला ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला,’ ‘हम होंगे कामयाब’ यांसारख्या सुरावटी शिकायचा मोह पडतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

चिनी मातीच्या ज्या भांड्यांमध्ये कमी-अधिक पाणी भरून तुळाणकर बहारदार वादन करतात, ती भांडी सुमारे ८० वर्षं जुनी आहेत. तुळाणकर म्हणाले, ‘‘माझ्या आईचे वडील पंडित शंकर विष्णू कान्हेरे नामवंत जलतरंगवादक होते. त्यांना मी याच बाउल्सच्या सेटवर रियाझ करताना बघायचो. मला मात्र तेव्हा हार्मोनियम व संतूरवादन आणि गाण्यात रस होता. १२-१३ वर्षांचा असताना मी आजोबा घरात नसताना जलतरंग वाजवायचो.

आजी स्नेहलता ही दिलरुबा वाजवायची. ती एकदा आजोबांना म्हणाली की, तुम्ही याचं जलतरंगवादन नक्की ऐका. आजोबांनी मला वाजवायला सांगितलं. ऐकल्यावर म्हणाले की, तू जी इतर वाद्यं वाजवतोस, गातोस; त्यात अनेक कलावंत तयार होतील. पण जलतरंगावर भर दिलास तर तू विरळा वादक ठरशील. शिवाय घराण्याची साखळी पुढे चालू राहील. आजोबांचं ते कळकळीचं सांगणं माझ्या हृदयाला भिडलं आणि मी यावर लक्ष केंद्रित केलं. सुमारे ३२-३३ वर्षं मी जलतरंग वाजवतो आहे.’

तुळाणकर यांनी असंही सांगितलं की, यावर मी आजोबांची परंपरा म्हणून रागदारी तर वाजवतोच, पण सर्वसामान्यांमध्ये या वाद्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी नाट्यगीत, भावगीत व चित्रपटगीतंही वाजवतो. चित्रपटांसाठी मी यावर इंग्रजी व तमीळ गीतंही वाजवली आहेत. सहा-साडेसहा इंच व्यासापासून दोन इंच व्यासाचे चिनी मातीचे बाउल्स यासाठी वापरले जातात. जास्त व्यास मंद तर कमी व्यासाच्या बाउलमधून तार (उंच) स्वर निघतो. पाण्याची पातळी कमी-जास्त करत बाउल सुरांत लावले जातात. यावर गुंजन निघणं, स्वरांना आस राहणं हे बाउलवर आघात करणाऱ्या रॉडच्या तंत्रावर अवलंबून असतं. याचा किणकिणता नाद निर्झर, नदी अशा निसर्गरम्य जागांची आठवण करून देतं. म्हणूनच की काय, निरागस वयाच्या मुलांना हे वादन शिकावंसं वाटतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: story on milind tulankar art