"जॅक',"मॅक'च्या गोष्टींमध्ये रमली मुले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

पुणे - स्वतःच्या जगात रमणारा आणि मांजरांची चित्रे काढण्याची आवड असणारा जपानी "जेझी', कोणत्याही संकटाला न घाबरता विविध युक्‍त्या करून स्वत:ची सुटका करणारा "जॅक', रंगीबेरंगी फुले, विविध पक्षी यांच्या दुनियेत रमणारा अमेरिकन "मॅक' अशा जगभरातील विविध लोककथांचे साभिनय सादरीकरण पाहण्याची मजा लहान मुले आणि पालकांनी अनुभवली. निमित्त होते "सकाळ वायआरआय'च्या आंतरराष्ट्रीय "स्टोरी टेलिंग फेस्टिव्हलचे'. 

पुणे - स्वतःच्या जगात रमणारा आणि मांजरांची चित्रे काढण्याची आवड असणारा जपानी "जेझी', कोणत्याही संकटाला न घाबरता विविध युक्‍त्या करून स्वत:ची सुटका करणारा "जॅक', रंगीबेरंगी फुले, विविध पक्षी यांच्या दुनियेत रमणारा अमेरिकन "मॅक' अशा जगभरातील विविध लोककथांचे साभिनय सादरीकरण पाहण्याची मजा लहान मुले आणि पालकांनी अनुभवली. निमित्त होते "सकाळ वायआरआय'च्या आंतरराष्ट्रीय "स्टोरी टेलिंग फेस्टिव्हलचे'. 

दोन दिवसांच्या या महोत्सवाचे उद्‌घाटन ईशान्या मॉलचे सरव्यवस्थापक सॅम वर्गिस यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या वेळी आंतरराष्ट्रीय कथाकथनकार जिवा रघुनाथ, रोझमेरी सोमाह, कॅरेन ली, रोझली बेकर, तान्या बॅट, पीटर फोस्टर, च्यूह अ लिन, जूम फेनिडा, जेफ गेरे, क्रेग जेनकिन्स उपस्थित होते. या महोत्सवासाठी लोकमान्य बॅंक आणि गिरिकंद ट्रॅव्हल्स यांनी सहकार्य केले आहे. 

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मुलांना जपान, सिंगापूर, अमेरिकेतील लोककथा ऐकण्यास मिळाल्या. त्याशिवाय पपेट शो, कॉच्युम पेपर स्टोरीज पाहण्याचाही मनमुराद आनंद मुलांनी लुटला. प्रश्‍नोत्तरांतून, कथांमधील झाडे, प्राणी अशा विविध पात्रांच्या भूमिकांतून कथाकथनकारांनी मुलांनाही कथांमध्ये सहभागी करून घेतले, तर गोष्टी सांगणाऱ्या कलाकारांबरोबर गाणी म्हणत लहानांसोबत मोठ्यांनीही त्या गोष्टींची मजा अनुभवली. 

येरवडा येथील ईशान्या मॉलमध्ये होत असलेल्या महोत्सवाची सांगता शनिवारी (ता. 19) सायंकाळी मॉलच्या ऍम्फी थिएटरमध्ये जगभरातील नऊ कथाकारांच्या एकत्रित "स्टोरी टेलिंग' कार्यक्रमाद्वारे होईल. 

फेस्टिव्हलमध्ये अनेक नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या. कथाकार खूप चांगल्या प्रकारे हावभाव करून गोष्टी सांगत होते. ते पाहून मजा वाटली. पपेट शोही मला खूप आवडला. 

- ईशान चोरडिया, सिंबोयसिस स्कूल. 

मला अमेरिकेच्या नेटिव्ह लोकांबद्दल सांगितलेली स्टोरी खूप आवडली. गोष्टींसोबतच विविध देशांबद्दल त्यांनी सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची होती. मी माझ्या इतर मैत्रिणींनाही या गोष्टी सांगणार आहे. 

- जॅझमीन शाह, सिम्बॉयसिस स्कूल. 

आम्ही "ईशान्या आर्ट अँह कल्चरल क्‍लब'च्या माध्यमातून नेहमीच पारंपरिक कलांच्या जतन, संरक्षण आणि प्रोत्साहनाचे काम करत असतो. "सकाळ'तर्फे घेण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे या पारंपरिक कलेला प्रोत्साहन तर मिळतच आहे, याशिवाय मुलांना भारतीय कथांसोबतच आंतरराष्ट्रीय लोककथा ऐकण्याचा एक चांगला अनुभव मिळत आहे. 

- महेश एम., मुख्य कार्यकारी अधिकारी. ईशान्या मॉल 

भारतीय संस्कृतीत कथाकथन ही एक प्राचीन परंपरा आहे. पूर्वी घरातील ज्येष्ठ लोक मुलांना विविध गोष्टी सांगत असत. मात्र आजच्या इंटरनेटच्या युगात मुले या आनंदापासून वंचित राहत आहेत. अशा उपक्रमांमधून मुलांना गोष्टी ऐकण्याचा आनंद मिळत आहे. त्यासाठी "सकाळ'ने आयोजित केलेला हा फेस्टिव्हल हा एक स्तुत्य उपक्रम आहे. 

- सुशील जगताप, विभागीय प्रमुख, लोकमान्य बॅंक 

Web Title: Story Telling Festival Opening