जुन्नरला पथदिव्यांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरजवळील पदपथावर तीन महिन्यांपूर्वी लावलेल्या महागड्या पथदिव्यांची अज्ञातांनी तोडफोड केली.

जुन्नर (पुणे) : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरजवळील पदपथावर तीन महिन्यांपूर्वी लावलेल्या महागड्या पथदिव्यांची अज्ञातांनी तोडफोड केली.
 
मंगळवारी (ता. 5) रात्री साडेअकरानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हे कृत्य केल्याची फिर्याद शिवजन्म भूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रवींद्र काजळे यांनी जुन्नर पोलिसांकडे दिली आहे. जुन्नर आपटाळे रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वरसुबाई मंदिर मार्गावर एक किलोमीटर अंतरात 90 दिवे लावण्यात आले आहेत. त्यातील एका दिव्याची किंमत 61 हजार 500 रुपये असून यासाठी 55 लाख रुपये खर्च आला आहे. वरसुबाई मंदिराच्या जवळील चार दिवे दगड मारून फोडताना आवाज आल्याने या परिसरात राहणारे विजय मोघे घराबाहेर येऊन ओरडले असता दिवे फोडणारे पळून गेले असे काजळे यांनी सांगितले.
शिवनेरी विकास प्रकल्पातून विकासाची कामे सुरू असताना तीन महिन्यांपूर्वी हे काम पूर्ण झाले होते. या दिव्यांच्या देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षेची उपाययोजना जुन्नर नगरपालिकेने करायची असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत विभाग सहाय्यक अभियंता अतुल जकाते यांनी दिली.

किल्ले शिवनेरीवर यापूर्वी लावण्यात आलेले अनेक पथदिवे असेच फोडण्यात आले होते. तो प्रकार ध्यानात घेता, पथदिव्यांच्या पदपथ मार्गावर सुरक्षेचे पर्याय किंवा सीसाटीव्ही बसविण्याची मागणी काजळे यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. हा मार्ग ज्येष्ठ नागरिकांना सांयकाळी चालण्यासाठी करण्यात आला आहे. येथे तरुण बसून महिला व मुलींची टिगल टवाळी करताना दिसतात. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Street Lamps Damaged In Juuner