तणावाच्या व्यवस्थापनातून तरुणांना यश

दीपेश सुराणा
रविवार, 13 मे 2018

उपाययोजना : 
* तणाव नियंत्रणासाठी त्वरित मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्या. 
* आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करा. 
* दररोज मैदानी खेळ खेळा. 
* नियमित योगा, ध्यानधारणा करा. 
* व्यसनांपासून पूर्णपणे दूर रहा. 

पिंपरी : बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतणावाचे प्रमाण वाढले आहे. ताणावर वेळीच नियंत्रण न मिळविल्यास त्याचे मानसिक व शारीरिक दुष्परिणाम भोगावे लागतात. आयटी असो किंवा अभिनयाचे, प्रत्येक क्षेत्रात असे ताणतणाव जाणवतात. या तणावांचे योग्य व्यवस्थापन करून तरुणाई विविध क्षेत्रात यश मिळवते आहे. जागतिक ताणतणाव निवारण दिन रविवारी (ता. 13) आहे. त्यानिमित्त तरुणाईशी साधलेला हा संवाद. 

कामाचा अतिताण 
"आयटी क्षेत्रात काम करताना चोवीस तास कामाविषयी जागरूक राहावे लागते. कधीकधी कंपनीच्या गरजेनुसार रात्री दोनपर्यंत काम करावे लागते. ज्ञान अद्ययावत ठेवावे लागते. अन्यथा इतरांच्या तुलनेत मागे पडण्याच्या भीतीमुळे ताण कमी करण्यासाठी योगासने, व्यायाम करतो,'' असे अभियंता अमित तलाठी याने स्पष्ट केले. 

काम ठेवावे लागते उत्तम 
"अभिनय आणि गायनात सुधारणा करावी लागते. काम मिळविण्यासाठी आणि ते टिकविण्यासाठी उत्तम काम करावे लागते. शूटींगच्या बदलणाऱ्या वेळा, चित्रीकरणासाठी धावपळ कायम असते. मात्र, सकारात्मक विचार, नियमित चालणे, पुरेसे डाएट, ओम्‌कार जप या माध्यमातून मी तणावाचे व्यवस्थापन करते,'' अशी माहिती गायिका, अभिनेत्री सायली सांभारे यांनी दिली. 

अनिश्‍चिततेमुळे तणाव 
"नाट्यक्षेत्रात अनिश्‍चितता हेच प्रमुख तणावाचे कारण असते. आज काम मिळाले तर उद्या मिळेल की नाही, याची शाश्‍वती नसते. वाचन, मनन, चिंतन आणि निरीक्षणशक्ती उत्तम ठेवावी लागते. व्यसनांपासून दूर राहिल्यास ताण नियंत्रणात राहतो,'' असे नाट्य अभिनेते योगेश दळवी यांनी सांगितले. 

अतिताण आरोग्यासाठी हानिकारक 
अतिताण हा आरोग्यासाठी हानिकारक असतो. शारीरिक आणि मानसिक अशा तणावांना व्यक्तीला सामोरे जावे लागते. क्षमतेपेक्षा जास्त परिश्रम, अति व्यायाम हे शारीरिक तणावात मोडते. सहनशक्तीपेक्षा घेतलेला जादा ताण हा मानसिक तणावाचा प्रकार आहे. झोप न लागणे, अतिजागरण, व्यसनाधीनता, चिडचिडेपणा, स्वतःबद्दल न्यूनगंड, आत्महत्येचे विचार येणे, मनाची भ्रमिष्ट अवस्था ही तणावाच्या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. 
- डॉ. गौरव वडगावकर, मानसोपचारतज्ज्ञ 

उपाययोजना : 
* तणाव नियंत्रणासाठी त्वरित मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्या. 
* आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करा. 
* दररोज मैदानी खेळ खेळा. 
* नियमित योगा, ध्यानधारणा करा. 
* व्यसनांपासून पूर्णपणे दूर रहा. 

Web Title: stress in youths