बारामतीत रोडरोमिओंना पोलिसांकडून प्रसाद

मिलिंद संगई
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

विनाकारण शाळा व महाविद्यालयांबाहेर टाईमपास करणाऱ्या रोडसाईड रोमिओंना आता पोलिसांकडून चांगलाच प्रसाद मिळणार आहे. उपविभागीय अधिकारी नारायण शिरवागवकर यांनीच आता या बाबत पुढाकार घेतला आहे. 

बारामती- विनाकारण शाळा व महाविद्यालयांबाहेर टाईमपास करणाऱ्या रोडसाईड रोमिओंना आता पोलिसांकडून चांगलाच प्रसाद मिळणार आहे. उपविभागीय अधिकारी नारायण शिरवागवकर यांनीच आता या बाबत पुढाकार घेतला आहे. 

शाळा व महाविद्यालयातील अनेक विद्यार्थींनीना काही टारगट मुले छेडछाड करतात अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी आल्यानंतर आता पोलिसांनी या रोमिओंवर लक्ष केंद्रीत केले आहे. स्वताः उपविभागीय अधिकारी, त्यांचे गुन्हे शोध पथक, बारामती शहर व तालुक्याचे गुन्हे शोध पथक, दामिनी व निर्भया पथक असे संयुक्तपणे दररोज शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या बाहेर ही मोहिम राबविणार आहेत.

मुलींना विनाकारण त्रास देणे, शाळा व महाविद्यालयांच्या ओळखपत्राविना विनाकारण घुटमळणे अशा प्रकारांमध्ये सहभागी रोमिओंना पोलिसांचा प्रसाद मिळू शकतो. दरम्यान, वाहन चालविण्याचा परवाना नसताना दुचाकी चालविणे, एकाच दुचाकीवरुन तिघांनी जाणे, विनाकारण वेगाने गाडी चालविणे अशा प्रकारांबाबतही आता पोलिस कायदेशीर कारवाई करणार आहेत. वाहनांबाबतच्या प्रकारात मुले सापडल्यास त्यांच्याविरुध्द खटला भरुन पालकांना न्यायालयात उपस्थित करुन त्यांच्याकडून दंडवसूलीचीही तयारी आता पोलिसांनी सुरु केली आहे. 

शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिकरित्या वाढदिवस साजरे करण्यासह केक कापण्यासाठी तलवारींचा सर्रास वापर केल्याच्याही घटना समोर येत आहेत. अशा प्रकारे तलवारींचा वापर झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असाही इशारा शिरगावकर यांनी दिला आहे. 

पालकांनी मुलांवर लक्ष ठेवायला हवे...
आपला मुलगा परवाना नसताना दुचाकी चालवतो का, त्याचे मित्र कोण आहेत, तो कोठे जातो येतो, या बाबत पालकांनी जागरुक असणे गरजेचे आहे, असे नारायण शिरगावकर यांनी स्पष्ट केले आहे. मुलांवर कारवाई झाल्यानंतर आम्हाला माहिती नव्हती ही पालकांची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: strictly action by police on roadromeo