जिल्हा रूग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप

मिलिंद संधान
मंगळवार, 17 एप्रिल 2018

कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मागील आठवड्यात काम बंद न करता काळ्या फिती लावून राज्य संघटनेच्या आंदोलनात सहभाग दर्शविला होता.

नवी सांगवी (पुणे) - किमान वेतन, नियमित वेतन वाढ, व विनाअट शासनाच्या सेवेत सहभागी करून घेणे यासारख्या मागण्यांच्या कारणास्तव येथील जिल्हा रूग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अधिकारी व कर्माचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे रूग्णांच्या सेवेवर त्याचा परिणाम झाल्याने रूग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.

एनएचएम अंतर्गत डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, कार्यालयीन स्टाफ यासारखे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मागील आठवड्यात काम बंद न करता काळ्या फिती लावून राज्य संघटनेच्या आंदोलनात सहभाग दर्शविला होता. परंतु चार दिवसापुर्वी राज्यस्तरीय बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विषयावर सकारात्मक निर्णय न झाल्याने आज अचानक काम बंद पुकारून कामबंद केले. बंद व मागण्यांबाबतचे निवेदन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकांच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रूद्राप्पा शेळके यांना देण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शेळके म्हणाले, "सकाळी अकराच्या सुमारास मला बंदच्या संदर्भातील निवेदन मिळाले. आमच्याकडील नियमित स्टाफ, प्रशिक्षणार्थी डॉक्टर, शिकाऊ परिचारीका यांच्यामुळे रूग्णसेवेवर कोणताही ताण आला नाही. लहानमुलांचा वॉर्ड, डायलेसिस सारख्या ठिकाणी काम करणारे कर्मचाऱ्यांनी हजेरी लावल्याने सर्व सुरळीत चालु आहे."

संप मागे घ्यायचा की पुढे तसाच चालु ठेवायचा हे आज मुंबई येथे आरोग्य मंत्र्यांसमवेत होणाऱ्या चर्चेवर अवलंबून राहील.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strike of Contract employees in District Hospital