
Pune News : वखार महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण
पुणे : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या व्यवस्थापनाला कर्मचारी महासंघाने लाक्षणिक उपोषणाची नोटीस देऊनही व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत गाडीवान यांनी केला.
महाराष्ट्र स्टेट वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन कर्मचारी महासंघाच्या वतीने ९ मार्चपासून लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. महामंडळाचा पेट्रोल पंप ठेकेदाराला चालवण्यास देण्यासाठी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पाडली.
महामंडळाच्या मुख्य कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीसाठी सुसज्ज व्यवस्था करण्यासाठी गतवर्षी लाखोंचा खर्च करण्यात आला. परंतु पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठकीवर पैशांची उधळण केल्याची टीका महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
कोरोना कालावधीत कर्मचारी वर्गाने अहोरात्र मेहनत घेऊन गहू-तांदूळ सार्वजनिक वितरणाची सेवा बजावली. तसेच, किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी साठ्याबाबत कर्तव्य पार पाडूनही प्रशासन कर्मचाऱ्यांच्या अडचणींबाबत दखल घेत नाही, अशी खंत व्यक्त महासंघाकडून व्यक्त करण्यात आली.