देशाला स्वातंत्र्य मिळूनही संघर्ष सुरूच : डॉ. सुधांशू त्रिवेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेक्कन एज्युकेशन सोसायटी

देशाला स्वातंत्र्य मिळूनही संघर्ष सुरूच : डॉ. सुधांशू त्रिवेदी

पुणे : "देशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु लोकमान्य टिळक यांना अभिप्रेत असलेले 'स्वराज्य'मधील 'राज्य' आपल्याला मिळाले. पण 'स्व'च्या स्वातंत्र्याचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे," असे मत भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी व्यक्त केले.विश्व संवाद केंद्र (पश्चिम महाराष्ट्र) आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार' वितरण सोहळ्यात डॉ. त्रिवेदी बोलत होते. यावेळी त्यांनी 'राष्ट्रीय चारित्र्य निर्माण आणि प्रसारमाध्यम' विषयावर व्याख्यान दिले. ते म्हणाले, "देशाच्या स्वातंत्र्यात राजनैतिक, क्रांतिकारक आणि सैन्य या तीन माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे नागरिकांना दाखवायचे होते, केवळ तेच दाखविण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांचा वापर केला आणि विविध प्रसार माध्यमातून विशिष्ट प्रकारचा समज पसरत गेला. त्यावेळच्या सरकारने प्रसारमाध्यमे काबीज केली होती. ५० ते ६० च्या दशकात देशात विविध माध्यमातून हिंदू विरोधी वातावरण पसरविण्याचा प्रयत्न झाला. भगवी वस्त्रधारी, कंठीमाळा व टिळा लावणाऱ्या व्यक्तिरेखा चित्रपटांमध्ये नव्हत्या. तर जवळपास ७४ टक्के चित्रपटांमध्ये शीख माणसाला विनोदी शैलीने, तर हिंदू पंडितांना ढोंगी दाखविण्यात आले. भारतीय संस्कृती विरोधी विचार आतापर्यंत देशातील तीन पिढ्यांपासून मनात रुजविण्याचा प्रयत्न सोईस्करपणे करण्यात आला. याकडे बारकाईने पाहण्याची आणि हे समजून घेण्याची गरज आहे."

ब्रिटिश सरकारचे सचिव हे ज्या पक्षांचे संस्थापक आहेत, ते जाणीवपूर्वक भारतीय नागरिकांना हिंदूत्वापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही टीकाही डॉ. त्रिवेदी यांनी काँग्रेस पक्षाचे नाव न घेता केली. हिटलरचे राजवटीतील उलट्या स्वस्तिकांचा आणि भारतीय संस्कृतीतील स्वस्तिक यांचा संबंध एकमेकांशी बांधून हिंदूत्वविरोधी प्रचार केला जात असून हिटलरच्या राजवटीतील उलटे स्वस्तिक कशाला अभिप्रेत आहे, हे जाणून घ्या,असेही डॉ. त्रिवेदी यांनी अधोरेखित केले. यावेळी डॉ. त्रिवेदी यांनी भारतीय संस्कृती, देव-देवता यांचा जगभरातील अन्य देशांमधील संस्कृतीशी असणारा संबंध, तसेच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील ऋणानुबंध याबद्दलही सांगितले.

भारत म्हणून आम्हाला जगावर वर्चस्व करायचे नाही, तर आम्हाला जगाला प्रेरित करायचे आहे. त्यामुळे भारत जगात महासत्ता बनण्याचे आपले स्वप्नं नाही, तर जगात विश्वगुरू बनायचे असून त्यादिशेने वाटचाल करत आहोत."

- डॉ. सुधांशू त्रिवेदी